पडझडीनंतर पर्यायी व्यवस्था नाही

नवी मुंबई तुर्भे गणपतीपाडा येथील अंगणवाडीचे रविवारी छत कोसळले. सुट्टीचा दिवस असल्याने दुर्घटना टळली. मात्र गेली दोन दिवस पर्यायी व्यवस्था न झाल्याने मुलांना उघडय़ावर खाऊ वाटप करण्यात येत आहे.

ठाणे जिल्हा परिषदअंतर्गत १२३ अंगणवाडय़ा असून नवी मुंबईत ८४ अंगणवाडय़ा आहेत. रविवारी गणपतीपाडा येथील अंगणवाडीतील छताचे छप्पर अचानक कोसळले. या अंगणवाडीत ३ ते ६ वयोगटातील ४० मुले आहेत. या घटनेला दोन दिवस झाले तरी काहीही पर्यायी व्यवस्था करण्यात आली नाही. परंतु दोन दिवस झाल्यानंतरही याबाबत कोणतीच कार्यवाही होत नसल्याने स्थानिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे गेले दोन दिवस उघडय़ावरच मुलांना खाऊ वाटप करण्यात येत आहे.

जागेअभावी मुलांना बाहेरच खाऊ वाटप करण्यात आले व घरी पाठवले. अंगणवाडीच्या पडझडीची पाहणी जिल्हा परिषद अधिकाऱ्यांनी केली असून लवकरात लवकर जागा उपलब्ध करून देण्यात येईल असे अधिकाऱ्यांनी सांगितल्याचे अंगणवाडी सेविका वहिदा शेख यांनी सांगितले.

तुर्भे येथील अंगणवाडीचे छत कोसळल्याची घटना घडली असून आमच्या पर्यवेक्षकाकडून पाहणी करण्यात आली आहे. दोन दिवसांत परिसरातच भाडय़ाने जागा उपलब्ध करून अंगणवाडी सुरू करण्यात येईल.

-बालाजी कोरे,  प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास, ठाणे जिल्हा परिषद