शीव-पनवेल महामार्गावरील खड्डय़ांची समस्या सुटेना; कोपरा उड्डाणपूल परिसरातही खड्डे

शीव-पनवेल महामार्गावरील खड्डे आठ दिवसांत बुजवण्याचे आश्वासन नागपूरच्या पावसाळी अधिवेशनात देणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाने वाहनचालकांच्या तोंडाला पुन्हा पाने पुसली आहेत. आजही शीव-पनवेल महामार्गावरील खड्डय़ांची स्थिती जैसे थे आहे. खारघर येथील कोपरा गावाजवळील उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंना पडलेले खड्डे न बुजवल्याने या मार्गावरील वाहतूक कोंडी वाहनचालकांची डोकेदुखी ठरत आहे. तुर्भे उड्डाणपुलाजवळील खड्डे कायम असल्याने या ठिकाणची वाहने संथ गतीने पुढे सरकत आहेत.

बाराशे कोटी रुपये खर्च करून नव्याने बांधलेल्या शीव-पनवेल महामहामार्गाची यंदाच्या पावसाळ्यात अत्यंत दुर्दशा झाली आहे. या मार्गावरील सर्व उड्डाणपुलांवर खड्डे पडले आहेत. प्रत्येक उड्डाणपुलाच्या दुर्तफाही खड्डे आहेत. खड्डय़ांमुळे तुर्भे येथे झालेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराला आपला जीव गमवावा लागला होता. अनेक वेळा निवेदने देऊनही उपाययोजना होत नसल्याने नवी मुंबई मनसेने तुर्भे येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाची मोडतोड केली होती. हा प्रश्न राज्य पातळीवर चर्चिला गेला होता.

मनसेने यापूर्वी प्रत्येक मोठय़ा खड्डय़ाला मंत्र्यांची नावे देण्याचे आंदोलन केले होते. त्याची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी या मार्गातील खड्डय़ांची पाहणी करून आठवडाभरात सर्व खड्डे भरण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले होते. नागपूर पावसाळी अधिवेशनात चंद्रकात पाटील यांनीही राज्यातील सर्व खड्डे ५ सप्टेंबपर्यंत बुजवण्याचे आश्वासन दिले आहे, मात्र अद्याप स्थिती जैसे थे आहे.

पावसाने उघडीप दिल्यानंतरही ही समस्या सुटलेली नाही. तुर्भे उड्डाणपुलाजवळ पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम सुरू असल्याने पुण्याकडे जाण्यासाठी एकच मार्गिका मोकळी आहे. त्यामुळे या मार्गावर वाहतूक संथगतीने सुरू आहे. वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. पुण्याकडे जाताना कोपरा पुलाजवळ मोठा खड्डा पडला असून तेथे पाणी साचले आहे. त्यामुळे भरघाव वेगात येणाऱ्या वाहनांची गती या पुलाजवळ रोखली जात आहे. हीच स्थिती पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांची आहे. बेलापूर खिंडीतील उड्डाणपुलाजवळही काही खड्डे कायम आहेत. त्यामुळे भरधाव प्रवासासाठी प्रसिद्ध झालेला हा मार्ग आता अडथळ्यांच्या प्रवासासाठी ओळखला जाऊ लागला आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून येणाऱ्या अनेक वाहनांचा वेळ कोपरा येथील उड्डाणपुलाजवळ वाया जात आहे.

शीव-पनवेल महामार्गाची दुरुस्ती होण्यासाठी मनसेने सातत्याने आंदोलने छडली आहेत. बाराशे कोटी रुपये खर्च करूनही प्रवास सुकर होत नसेल तर वाशी खाडी पुलावरील टोल वसुलीही बंद करण्यात यावी, अशी मनसेची मागणी आहे.

– गजानन काळे, शहर अध्यक्ष, मनसे

शीव-पनवेल महामार्गावरील खड्डे भरण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सातत्याने खड्डे पडणाऱ्या ठिकाणी पेव्हर ब्लॉक लावण्यात आले आहेत. तुर्भे आणि कोपरा पुलाजवळील खड्डे बुजवण्यात आले असून येत्या आठवडय़ात सर्व खड्डे भरले जाणार आहेत.

– के. पी. पाटील, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम