स्मार्ट फोन, मॉल्समुळे नात्यांचा ओढा कमी
‘झुकु झुकू आगीनगाडी धुरांच्या रेषा हवेत काढी’ हे गाणे गुणगुणत पळती झाडे पाहणाऱ्या अनेकांचा मामाचा गाव अलीकडे खूप दूर गेला आहे. वार्षिक परीक्षा संपली की मामाकडे जाण्याची ओढ मुलांना लागतेच; परंतु आजकाल परीक्षेनंतर टीव्ही, व्हिडीओ गेम, मॉल्समध्ये खरेदी आणि स्मार्ट फोनवरील मनोरंजनामुळे निसर्गाची ओढ शिल्लक राहिलेली नाही. गावांचेही रूपडे पलटू लागल्याने सुट्टीच्या काळात मामाच्या गावाकडे झुकुझुकू जाणाऱ्या आगीनगाडीच्या धुराच्या रेषाही अदृश्य होऊ लागल्या आहेत.
शहर आणि गावात सध्या भीषण पाणीटंचाई सुरू आहे. त्यामुळे गावातील माणसे शहरांकडे धाव घेऊ लागली आहेत. पावसाचे प्रमाण कमी झाल्याने अनेक गावे ओसाड पडली आहेत. अशी स्थिती महाराष्ट्रात बहुतांशी ठिकाणी निर्माण झाली आहे. त्यामुळे पिढय़ान्पिढय़ा शाळेच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत कोणी मामाच्या गावाला गेला नाही, असा एकही जण सापडणार नाही. त्यामुळे शाळेत शेवटचे पेपर सुरू असतानाच अनेक जण मी माझ्या मामाच्या गावाला अमुक ठिकाणी जाणार आहे. याची माहिती मुलांना देत बाहेरगावी जाण्याचा आनंद व्यक्त करीत असतो. असे असले तरी या गोष्टी आता इतिहास जमा होऊ लागल्या आहेत. याची अनेक कारणे असली तरी शहर आणि निमशहरातील धावपळ आणि दगदगीच जीवन त्यातून वर्षांतून एक ते दोन वेळा वेगवेगळ्या ठिकाणी होणारी पिकनिक ही सुद्धा नित्याची झाली आहे. ज्यांच्याकडे पैसा असतो ते तर थेट परदेशीच आपल्या मुलांना मजा करण्यासाठी नेऊ लागले असल्याचे मत अशोक दांडेकर या नागरिकांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे या निमित्तानेही का होईना आपले नातेवाईक, सगेसोयरे यांच्याकडे जाऊन काही दिवस राहण्याने जे ऋणानुबंध निर्माण होत होते त्यालाही सध्या लहानगी परकी झाली आहेत. त्यातच अनेक ठिकाणी आई आणि मामा, काका यांच्यात जमिनी तसेच संपत्तीवरून होणारे वादही विकोपाला गेल्याने मुलांच्या गावी जाण्यावर परिणाम होत असल्याचे मत अनंत घरत यांचे म्हणणे आहे. गरीब बहिणीच्या मुलांना मामांच्या घरचाच आधार मिळत असल्याने दिलासा मिळत होता. मामाची आर्थिक स्थिती चांगली असल्याने सुटीचे दोन महिने बहीण काही मुलांना मामाकडे ठेवून व्यवसाय करीत होती. आजही अशा बहिणींना भावांचाच आधार आहे.