महिनाभरात तीनपट वाढ; करोना उपचाराधीन रुग्णसंख्याही १३१४ पर्यंत गेल्याने चिंता

लोकसत्ता प्रतिनिधी

नवी मुंबई : नवी मुंबईतील करोनाची परिस्थिती पुन्हा एकदा गंभीर होत आहे. वाढलेली करोना रुग्णसंख्या कमी होत नसल्याने उपचाराधीन रुग्णांची संख्या दुपटीने वाढत १३१४ पर्यंत गेली आहे. तर महिनाभरात करोना रुग्णांच्या संपर्कात आल्याने  २५ हजार ८३२ नागरिकांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. महिनाभरात यात तीन पटीने वाढ झाली आहे.

नवी मुंबईचा करोनामुक्तीचा दर हा ९६ टक्कय़ांपेक्षा अधिक झाला असला, तरी महिनाभरात नव्या रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत असल्याने पालिका प्रशासन चिंतेत आहे. सातत्याने दैनंदिन करोना रुग्ण वाढ होत असल्याने घरीच विलगीकरणात असलेले नागरिक घराबाहेर पडण्यावर कडक र्निबध घातले असून मंगळवारपासून गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.

शहरात फेब्रुवारी महिन्यात सातत्याने दैनंदिन करोना रुग्णसंख्या वाढली आहे. त्यामुळे  पालिकेला पुन्हा एकदा करोना काळजी केंद्रे सुरू करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. जानेवारी महिन्यात शहरात एकमेव सिडको येथील प्रदर्शनी केंद्र सुरू होते. त्या ठिकाणी उपचाराधीन रुग्णसंख्या १५० पर्यंत खाली आली होती. आता तेथील उपचार घेणाऱ्या  रुग्णांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली असून ती ३०० पर्यंत गेली आहे. दैनंदिन रुग्णसंख्या आता १५० पर्यंत गेली आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्या  ८०० पर्यंत खाली आली होती. ती आता १३१४ पर्यंत गेली आहे. रुग्णसंख्या सातत्याने वाढत असल्याने शहरातील करोनाबाधितांची संख्या ५५ हजारपेक्षा अधिक झाली आहे, तर आतापर्यंत ११२० जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

ही परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने पालिका प्रशासनाने शहरात कडक र्निबध लागू केले आहेत. लग्न समारंभासह इतर कार्यक्रमांना ५० पेक्षा कमी उपस्थिती बंधनकारक केली असून नियम न पाळल्यास आयोजकांवरच गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. तर आता राजकीय कार्यक्रमांनाही र्निबध लागू करण्यात आले आहेत.  तसेच  मंगळवारपासून पुन्हा एकदा कारवाईसाठी मोठी मोहीत हाती घेण्यात येणार आहे. पुढील १५ दिवसात धडक कारवाईचे निर्देश पालिका आयुक्तांनी सामेवारच्या बैठकीत दिले आहेत.

विलगीकरणात वाढ

शहरात १ फेब्रुवारी रोजी घरीच विलगीकरणात असलेल्यांची संख्या ७ हजार ९८६ इतकी होती. ती १ मार्च रोजी २४ हजार १६३ म्हणजेच तीन पटीने वाढली आहे. हे सर्व करोना रुग्णांच्या संपर्कातील असल्याने त्यांच्यापैकी अनेक जण करोना सकारात्मक येण्याची शक्यता असल्याने पुन्हा आरोग्य यंत्रणा उभारण्याची गरज भासणार आहे.

शहरात करोनाची संख्या नक्कीच वाढत आहे.  यात आणखी वाढ होऊ शकते. त्यामुळे पुन्हा एकदा मंगळवारपासून पुढील १५ दिवस कडक कारवाईचे नियोजन करण्यात आले आहे. विलगीकरणात असलेली व्यक्ती जर घराबाहेर पडली तर त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे.

-अभिजीत बांगर, आयुक्त, नवी मुंबई महापालिका 

१५१ नवे करोनाबाधित

नवी मुंबई : नवी मुंबईत गेल्या काही दिवसांपासून दैनंदिन करोना रुग्णांची संख्यावाढली असून  सोमवारी  १५१  नवे करोनाबाधित आढळले  तर एकही जणाचा मृत्यू झाला नाही. रुग्ण वाढ झाल्याने शहरातील करोनाबाधितांची संख्या  ५५,५५० इतकी झाली आहे. शहरात करोनामुक्तीचा दर ९६ टक्के  सोमवारी ९८ जण करोनामुक्त झाले. आतापर्यंत ५३,०६३  जण करोनामुक्त झाले आहेत. उपचाराधिन रुग्ण १,३३७  इतके आहेत. तर एकूण मृत्यू  झालेल्यांची संख्या १११८  इतकी झाली आहे.