अटकेच्या भीतीने एकाची आत्महत्या; दहा वाहने जप्त

नवी मुंबई : महागडय़ा गाडय़ा भाडय़ाने देण्याचे आमिष दाखवून परस्पर विकणारी टोळी पनवेल तालुका पोलिसांनी गजाआड  के ली आहे. या प्रकरणी ४१ लाख ५० हजार रुपये किमतीच्या १० गाडय़ा जप्त करण्यात आल्या आहेत. यातील एका आरोपीने पकडले जाण्याच्या भीतीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

सुरज पाटील, जगदीश चौधरी आणि राजशेखर चेके असे यातील आरोपींचे नाव आहेत. सुरज पाटील आणि जगदीश चौधरी यांना अटक करण्यात आले असून राजशेखर याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. पनवेल नजीक डेरवली गावातील ज्ञानेश्वर पेढेकर यांनी आरोपींनी स्वत:ची एर्टिगा गाडी सुरज पाटील याच्या सांगण्यावर भाडे तत्त्वावर दिली होती. ही गाडी ‘पी सिस्टीम’  या कंपनीत भाडेतत्त्वावर लावण्यात आली असल्याचे सांगितले. पहिले दोन ते तीन महिने ठरल्याप्रमाणे भाडेही देण्यात आले. मात्र नंतर भाडे देण्यास टाळाटाळ सुरू करीत संपर्कही बंद केला. त्यामुळे पेढेकर यांनी या बाबत पनवेल तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली.  अशाच प्रकारचे अन्य सहा तक्रारी असून  यातही सुरज जगदीश आणि राजशेखर यांचेच नाव समोर आल्याने परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक  नितीन भोसले

यांच्या नेतृत्वाखाली पथक नेमून तपास सुरू करण्यात आला. या तिन्ही आरोपींचा ठावठिकाणा लागत नव्हता. त्यांचे मोबाइल बंद असल्याने तांत्रिक तपासही खुंटला होता. मात्र या तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय खेडेकर आणि पोलीस उपनिरीक्षक आकाश पवार यांना पुणे परिसरात राजशेखर यांच्या बाबत माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे त्याला अटक करण्यासाठी पथक गेलेही मात्र त्यापूर्वीच पकडले जाण्याच्या भीतीने आत्महत्या केल्याचे समोर आले. त्यामुळे पुन्हा पोलिसांच्या हातातील दुवा निखळला.

मात्र या मयत आरोपीकडील मोबाइल क्रमांकावरून तांत्रिक तपास केला असता सुरज आणि जगदीश यांच्याविषयी माहिती मिळताच धायरीवरून सुरज व जगदीश याला कोपरखैरणे येथून अटक करण्यात आली.  अटक के ल्यावर त्यांच्या चौकशीतून त्यांनी भाडेतत्त्वावर गाडी देण्याचे आमिष दाखवून गाडय़ा ज्यांना स्वस्तात विकल्या व स्वत: जवळ बाळगलेल्या अशा १० गाडय़ा जप्त करण्यात आल्या आहेत. यापूर्वी एक कोटी ८ लाखांची फसवणूक

आरोपींचे राहणीमान उंची पद्धतीचे असून गुन्ह्यतून कमावलेल्या पैशातून मौजमजा करत होते.  त्यांच्यावर यापूर्वी डी.बी. मार्ग पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून एका संगणक व्यावसायिकाला त्यांनी तब्बल एक कोटी ८ लाख ११ हजारांची फसवणूक केली आहे. आरोपींनी भाडय़ाने गाडीचे आमिष दाखवण्यातही कुठेही कार्यालय उभे केले नव्हते फक्त ओळखीतून (माऊथ पब्लिसिटी) ते सावज शोधत होते.

भाडय़ाने गाडी देताना नागरिकांनी सर्व

शहानिशा करणे आवश्यक आहे. ज्या कंपनीत गाडी भाडय़ाने देण्याचे ठरले तेथे एकदा तरी प्रत्यक्ष भेट घेत स्वत:च्या समोर भाडे करार करावा. कायदेशीर बाबी पार पडल्या तर फसवणूक होणार नाही. -शिवराज पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन