मुंबईतील वाहन तपासणीमुळे नवी मुंबईत दोन दिवस प्रचंड वाहतूक कोंडी

शेखर हंप्रस, लोकसत्ता

नवी मुंबई : मुंबईत नव्याने लागू केलेल्या टाळेबंदीत वाहतूक पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी सुरू केली आहे. त्यामुळे मुंबईतून येणाऱ्या वाहनांची वाशी पथकर नाक्यावर सलग दुसऱ्या दिवशी मोठी वाहतूक कोंडी झाली. मंगळवारी सकाळी पथकर नाक्यापासून काही मीटर अंतरावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या. सकाळी सात वाजल्यापासून वाहतूक कोंडीस सुरुवात झाली. दुपारनंतर परिस्थिती पूर्वपदावर आली. यात अत्यावश्यक सेवेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना याचा फटका बसला.

मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील करोना रुग्णांचा आकडा आटोक्यात यावा, यासाठी अतिसंक्रमित क्षेत्रात नव्याने टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे बाहेरून शहरात प्रवेश करणाऱ्यांची कसून चौकशी केली जात आहे. यासाठी शहरांत वाहतूक पोलिसांकडून ठिकठिकाणी नाकाबंदी सुरू करण्यात आली आहे. तपासणीदरम्यान मुख्य रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी वाहतूक पोलीस काळजी घेत नसल्याच्या तक्रारी वाहतूक कोंडीत अडकलेल्या वाहनचालकांनी केल्या आहेत.

वाशी पथकर नाक्यावर सोमवारी वाहतूक कोंडी झाली होती. त्यानंतर मंगळवारीही वाहतूक कोंडीचा फटका वाहनचालकांना सोसावा लागला. मात्र, नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी सोमवारच्या तुलनेत मंगळवारी वाहतूक कोंडी कमी झाल्याचा दावा केला आहे.

मंगळवारी मुंबईतून येणाऱ्या वाहनांच्या सानपाडा ते जुईनगपर्यंत  लागल्या होत्या. पश्चिम महाराष्ट्र आणि गोवा राज्यातून मुंबईत येणारी हजारो वाहने वाशीमार्गे मुंबईत प्रवेश करतात. पहाटे साडेपाच ते सकाळी १०  या वेळेत  वाहनांची संख्या मोठी असते. याच वेळी वाशी ते सानपाडा भागात मोठी वाहतूक कोंडी होत आहे.

नवी मुंबई तसेच मुंबईतील चेंबूर आणि मानखुर्द भागात नाकाबंदी लागू केली जात आहे. वाहनांची तपासणी आणि अन्य परवानग्यांची कागदपत्रे पाहिली जात आहेत. या साऱ्या प्रक्रियेत वेळ जात आहे. त्यामुळे वाहनाच्या लांबच लांब रांगा लागत आहेत.

याबाबत काही वाहनचालकांनी तक्रारी केल्या आहेत. अमर भानुशाली या दूधवाहन चालकाने याबाबत नियोजनाची अपेक्षा व्यक्त केली. वाहतूक पोलीस घेत असलेल्या नाकाबंदीला सर्वाचेच सहकार्य असेल. मात्र, गेले दोन दिवस नियोजनाअभावी  वेळ आणि इंधन खर्ची पडल्याचा मुद्दा काही चालकांनी मांडला.

तपासणीत शैथिल्य

नवी मुंबईत सोमवारी झालेली वाहतूक कोंडी प्रमाणाबाहेर गेली. या साऱ्या स्थितीचा आढावा घेऊन त्याबाबत मंगळवारी त्याचे गांभीर्य मुंबई वाहतूक पोलीस विभागाला कळविण्यात आले होते. मुंबईतील नाकाबंदीचा थेट परिणाम नवी मुंबईतील अन्य वाहनांच्या वाहतुकीवर होत आहे. याबाबत मुंबई वाहतूक पोलिसांच्या कानावर घालण्यात आले. त्यानंतर मानखुर्द आणि चेंबूर भागांतील वाहतूक नियंत्रण उपाय योजण्यात आले. त्यामुळे वाशी पथकर नाक्यावर होणारी वाहतूक कोंडी सुटत गेल्याचे नवी मुंबई वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

मुंबईत ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या नाकाबंदीमुळे सकाळी काही वेळ मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर वाहतूक कोंडी झाली होती. मात्र, दुपारनंतर स्थिती नियंत्रणात आणण्यात आली.

-भानुदास खटावकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा