गगनचुंबी इमारतींची वसाहत म्हणून खारघरची ओळख निर्माण झाली आहे, ही गोष्ट खरी आहे; परंतु यातील एखाद्या इमारतीला दुर्दैवाने आग लागलीच तर मात्र घर खाक होईपर्यंत वाट पाहायची वेळ भविष्यात अनेकांवर येण्याची भीती आहे. कारण सिडकोकडे १५व्या मजल्यापर्यंत जाऊन आग नियंत्रणात आणणारी यंत्रणा नाही. बुधवारी रात्री खारघर सेक्टर-२०मध्ये ‘गिरीराज हॉरायझन’ या १८ मजली इमारतीच्या १५व्या मजल्यावरील एका सदनिकेला आग लागली; परंतु सिडकोकडे तिथपर्यंत जाऊन आग नियंत्रण आणण्यासाठीची शिडीच नव्हती. तोवर किरकोळ स्वरूपाची आग भडकत गेली आणि अख्खं घर भस्मसात झालं. प्राची मुंढे यांच्या मालकीचे हे घर आहे. चार तासांच्या प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आली. दरम्यान आगीचे निश्चित कारण समजू शकले नाही.
सिडकोचा अग्निशमन दलाचा बंब वेळीच सुरू झाला नाही. त्यामुळे पाण्याचा पुरवठा होऊ शकला नाही. याशिवाय १५व्या मजल्यापर्यंत पोहचण्यासाठी सिडकोच्या अग्निशमन बंबांकडे कोणतीही यंत्रणा नसल्याने या आगीचे स्वरूप वाढले. रहिवाशांना इमारत खाली करण्यास सांगण्यात आले. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र या दुर्घटनेत १५व्या आणि १६व्या मजल्यावरील दोन सदनिका आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. तासाभराने नवी मुंबई महानगरपालिकेच्या उंच उद्वाहक यंत्राच्या मदतीने या आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू झाले.
गिरीराज या इमारतीमध्ये ए आणि बी अशा दोन विंगमध्ये १४४ सदनिका आहेत. प्रत्येक सदनिकेची किमत एक ते दीड कोटी रुपयांपर्यंत आहे. या इमारतीमध्ये अग्निशमन यंत्रणा आहे. मात्र बुधवारी रात्री ज्यावेळी आग विझविण्याची वेळ आली त्यावेळी इमारतीमधील रहिवाशांना अग्निशमन यंत्राचा वापर करता आला नाही. सिडकोची अग्निशमन दलाची यंत्रणा आग विझविण्यासाठी आली; मात्र त्यांच्याकडेही आठव्या मजल्यापर्यंत उंचीची साधने होती. त्यामुळे सोसायटीमधील अग्निशमन यंत्रणा सुरू करण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेतली. सोसायटीचा डिझेलपंप सुरू केल्यानंतर इमारतीची अग्निशमन यंत्रणा सुरू झाली. या आगीत इमारतीमध्ये सोळाव्या व अठराव्या मजल्यावर चारजण अडकले होते. खारघर पोलीस ठाण्यातील मनेश बच्चाव व संदीप पाटील या दोन पोलिसांनी टेरेसचा दरवाजा तोडून या सदनिकांमधून दोन जेष्ठांसह दोन लहान मुलांना सुरक्षित इमारतीखाली आणले. सिडकोने खारघर व कामोठे, पनवेलमध्ये ४० मजली इमारतींसाठी परवानगी दिली आहे. मात्र या इमारतींमध्ये आग लागल्यास ती विझवण्याची साधने सिडकोच्या अग्निशमन यंत्रणेकडे उपलब्ध नाहीत.

२०व्या मजल्यापर्यंत पोहोचणारे १० कोटी रुपयांपर्यंतची यंत्रणा विकत घेण्यासाठी सिडको प्रशासनाची दोन कंपन्यांशी बोलणी सुरू आहेत. सिडकोच्या अग्निशमन यंत्रणेने यापूर्वीही मोठय़ा प्रमाणात फायर फायटिंगचे कार्यक्रम खारघरमधील मोठय़ा गृहनिर्माण सोसायटय़ांमध्ये राबविले आहेत; मात्र या कार्यक्रमांना मोठय़ा गृहनिर्माण सोसायटय़ांमध्येच प्रतिसाद कमी मिळतो. आग नियंत्रणात आणण्यासाठीचे प्राथमिक पातळीवरचे प्रशिक्षण सिडको रहिवाशांना देते, या उपक्रमात रहिवाशांनी सहभागी होणे गरजेचे आहे.
– प्रवीण बोडके, सिडको, अग्निशमन दल प्रमुख, खारघर विभाग