उरणमध्ये दोन सिनेमागृहांसह नाटय़गृह तसेच मंगल कार्यालय तसेच व्यापारी संकुल उभारले जाणार आहेत. यासाठी शासनाकडून १२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या संकुलाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.

उरणमध्ये १९८६ पर्यंत एक सिनेमागृह होते. तर १९९६ नंतर नगरपालिकेने उभारलेल्या ९५० आसनांच्या राजीव गांधी टाऊन हॉलमध्ये नाटकासह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात होते. मात्र टाऊन हॉल काही वर्षांतच धोकादायक बनल्याने हे कार्यक्रम बंद झाले. याच टाऊन हॉलच्या जागी नव्याने तीन मजली नवे संकुल उभे केले जाणार असल्याची माहिती उरण नगरपालिकेचे नगराध्यक्ष महेश बालदी यांनी दिली. उरण नगरपालिकेचे अभियंता झेड. आर. माने यांनी हे संकुल मर्यादित कालावधीत तयार करण्यात येणार असल्याची माहिती दिली. हे संकुल लवकरच नागरिकांसाठी खुले केले जाणार असून याचा अंतिम आराखडा तयार करण्यात येत आहे. या संकुलाची उभारणी करण्यासाठी १२ कोटी रुपयांचा खर्च येणार असून दोन वर्षांत काम पूर्ण करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. यामुळे उरणमधील नागरिकांना नाटक, सिनेमा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचा आस्वाद घेण्याची संधी प्राप्त होणार आहे. या संकुलाची लवकरात लवकर उभारणी व्हावी, अशी अपेक्षा उरणच्या नागरिकांनी व्यक्त केली आहे.

संकुल असे..

एकूण ४४ हजार चौरस मीटर आकार, जी प्लस दोन अशी इमारत. तळमजल्यावर व्यापारी संकुल व वाहनतळ, पहिल्या मजल्यावर ६०० आसन असलेले ७५ बाय ६० फुटांचे नाटय़गृह, कम्युनिटी सेंटर, वाचनालय, दुसऱ्या मजल्यावर २०० आसनांचे दोन स्वतंत्र मल्टिप्लेक्स उभारण्यात येणार आहेत. मंगल कार्यालयही उभारण्यात येणार आहे.