सीवूड्स येथील सिडकोनिर्मित इमारतीतील घटना

नवी मुंबईतील सिडकोनिर्मित घरांचे प्लास्टर कोसळण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. सीवूड्स सेक्टर ४८ येथील साईसंगम सोसायटीतील एका घराचे प्लास्टर गुरुवारी कोसळले. त्यात घरातील दोन महिला जखमी झाल्या. छाया नारकर (७०) आणि कल्याणी भुरके (२०) अशी त्यांची नावे आहेत.

साईसंगम सोसायटीतील इमारत क्रमांक ४२, खोली क्रमांक ६ मध्ये राहणाऱ्या सुशांत नारकर यांच्या दिवाणखान्याच्या छताचे प्लास्टर पहाटे साडेसहा वाजता कोसळले. त्यात नारकर यांच्या आई छाया नारकर आणि बहीण कल्याणी भुरके जखमी झाल्या. त्यांना सीवूड्समधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेवेळी समीर नारकर, त्यांची पत्नी वर्षां आणि पाच वर्षांचा मुलगा स्पर्श दुसऱ्या खोलीत होते. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. दिवाणखान्याच्या भागातील संपूर्ण प्लास्टर कोसळल्यामुळे संगणक व इतर साहित्याचे नुकसान झाले. पंख्याची पाती वाकली.

सिडकोनिर्मित घरांच्या छताचे प्लास्टर कोसळणे  ही नित्याचीच बाब झाली असून, पुनर्वसनाचा प्रश्न मात्र रेंगाळलेलाच आहे. केवळ वाढीव चटईक्षेत्राचे अमिष दाखवले जात असले, तरी रहिवासी भीतीच्या छायेत जगत आहेत. सीवूड्समध्ये सिडकोनिर्मित ३२ सहकारी सोसायटय़ा आहेत. त्यात हजारो नागरिक राहतात. सीवूड्स, नेरुळ, वाशीसह अनेक ठिकाणी सिडकोच्या इमारतींत छताचे प्लास्टर कोसळण्याच्या अनेक दुर्घटना झाल्या आहेत.

घरांच्या पडझडीबाबत २००२ पासून अनेकदा सिडकोशी पत्रव्यवहार केला आहे. परंतु अद्याप न्याय मिळालेला नाही. जीव गेल्यावर सरकार निर्णय घेणार का? आमची विचारपूस करण्यासाठी सिडको वा पालिकेचा कोणताही अधिकारी फिरकला नाही. १८ वर्षांपूर्वी या घराचा ताबा घेतला, मात्र तेव्हापासूनच निकृष्ट बांधकामाचे अनेक दाखले मिळाले आहेत.

– समीर नारकर, साईसंगम सोसायटी, सीवूड्स

सिडको आतापर्यंत घरांची पडझड झाल्यानंतर दुरुस्ती करून देत असे. आता याबाबत काय करायचे यासंदर्भातील प्रस्ताव सिडको व्यवस्थापकीय संचालकांकडे आहे. त्यामुळे याबाबत काय धोरण ठरते त्यावरच पडझड झालेल्या घरांच्या दुरुस्तीबाबतचा निर्णय अवलंबून आहे.

– के. के. वरखेडकर, मुख्य अभियंता, सिडको

सिडकोकडून डागडुजी बंद?

पूर्वी छताचे प्लास्टर कोसळले किंवा अन्य काही पडझड झाली, तर सिडकोच्या वतीने दुरुस्ती केली जात असे. सिडकोने गेल्या सहा महिन्यांत अशी पडझड झालेल्या घरांची दुरुस्ती बंद केल्याचे दिसते. घरांचा पुनर्विकास होईपर्यंत अशी दुर्घटना घडल्यास सिडकोनेच दुरुस्ती करून द्यावी, अशी मागणी पत्राद्वारे केली आहे. परंतु सिडकोकडून अद्याप काहीच प्रतिसाद मिळालेला नाही, अशी माहिती शिवसेनेचे पदाधिकारी विशाल विचारे यांनी दिली.