पत्नी आणि दोन मुलांची हत्या करून एका व्यक्तीने आत्महत्या करत आपल्या कुटुंबाला संपविल्याची घटना तळोजा येथे शनिवारी उघडकीस आली. मात्र या घटनेतील आणखी एक विदारक बाब म्हणजे दोन महिन्यांहून अधिक काळ चार मृतदेह घरात असल्याचा पत्ता बाहेरच्या जगाला लागला नाही. भाडेवसुलीसाठी प्रतिसाद मिळत नसल्याने घरमालकाने दरवाजा तोडल्यानंतर हा धक्कादायक  प्रकार समोर आला.

तळोजा येथे शिवकॉर्नर गृहनिर्माण संकुलात नीतेशकुमार उपाध्याय (वय ३५) हे पत्नी तसेच मुलगा आणि मुलीसह राहत होते. काही महिन्यांपूर्वी त्यांनी या ठिकाणी भाडय़ाने घर घेतले होते. त्यांचे डिसेंबरपासून घरभाडे बाकी होते. एक महिन्यापासून ते फोन उचलत नसल्याने शनिवारी घरमालक भेटण्यासाठी आले. दरवाजा उघडून त्यांनी प्रवेश केला तेव्हा चौघांचे मृतदेह आढळले. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांना घरात चिठ्ठी आढळली. त्यात आत्महत्येस कोणासही जबाबदार धरू नये, असा मजकूर आहे.

नीतेशकुमार आठ महिन्यांपूर्वी शिवकॉर्नर सोसायटीत राहायला आले होते. कर्जामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. त्यांचा ऑनलाइन कपडे विकण्याचाही व्यवसाय असल्याची प्राथमिक माहिती आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी त्यांची पत्नी (वय ३०) मुलगा (वय ७), मुलगी (वय ८) यांची हत्या करून नंतर आत्महत्या केली असावी असा कयास आहे. आतील खोलीत दोन चिठ्ठय़ा आढळल्या आहेत. त्यापैकी एका चिठ्ठीत आम्ही आत्महत्या करीत आहोत. घरात पैसे आणि सोने आहे. आमचे मृतदेह ज्यांना सापडतील त्यांनी हिंदू रीतीनुसार अंत्यसंस्कार करावे. आमचे कोणीही नाहीत, असा मजकूरही दुसऱ्या चिट्ठीत आहे.

कर्जामुळे पाऊल? उपाध्याय यांचा ऑनलाइन कपडय़ांचा व्यवसाय होता. त्यांच्यावर कर्ज झाले असल्यामुळे त्यांनी कुटुंबासह स्वत:चे जीवन संपविण्याचा निर्णय घेतला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. एका चिठ्ठीत आम्हाला कुणीही नातेवाईक नसल्याचे म्हटले आहे. दरम्यान, याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.