News Flash

दोन परिचारिकांना अटक

रेमडेसिविरचा काळाबाजारावर पोलिसांची नजर

रेमडेसिविरचा काळाबाजारावर पोलिसांची नजर

नवी मुंबई : नवी मुंबईत रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार सुरू असल्याचे पोलिसांच्या आठवडाभरातील कारवाईतून स्पष्ट झाले आहे. खारघर येथील गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत आणखी दोन परिचारिकांना अटक केली आहे. त्यांना गुन्हा कबूल केला असून त्या दोघी वाशी येथील एका खासगी रुग्णालयात काम करीत होत्या.

रूत संजय इंगूळकर आणि ललिता संजय गुजरे अशी अटक परिचारिकांची नावे आहेत. त्यांना २८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी खारघर येथे हरपिंदर सिंग हा रेमडेसिविर इंजेक्शन विकत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. बनावट ग्राहक पाठवून त्याला अटक करण्यात आली होती. त्याने दिलेल्या माहितीवरून या प्रकरणी नेरूळ येथील डॉ. सर्वजित सिंह यालाही अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत रूत संजय इंगूळकर आणि ललिता संजय गुजरे या दोघींची नावे आली होती. या दोघी वाशीतील एका रुग्णालयात परिचारिका असून ते अन्य व्यक्तीकडून इंजेक्शन मिळवत होत्या. त्या व्यक्तीचा शोध पोलीस घेत आहेत. ही सर्व कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

या परिचारिका करोना रुग्णालयात काम करत होत्या. तेथील डॉक्टरांचा यात सहभाग आहे का याबाबत  चौकशी सुरू आहे. डॉ. सर्वजित हा यातील महत्त्वाचा आरोपी असून त्याने दिलेल्या चिठ्ठीवरून सदर इंजेक्शन मिळत होते.

रेमडेसिविर इंजेक्शन काळ्या बाजारात मिळत असल्याची माहिती मिळत असल्याने पोलीस आयुक्त बिपिन सिंह यांच्या सूचनेनुसार पोलीस सतर्क झाले असून लक्ष ठेवून आहेत. बेकायदा आणि चढय़ा किमतीत इंजेक्शन विक्रीची चार प्रकरणे आतापर्यंत उघड झाली आहेत. खारघर येथील कारवाई प्रकरणात मोठी टोळी कार्यरत असण्याची शक्यता असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.  

– डॉ. बीजी शेखर पाटील, सहआयुक्त, गुन्हे शाखा

रेमडेसिविरऐवजी रुग्णाला दुसरे इंजेक्शन

परिचारिका आणि डॉक्टर यांच्या चौकशीतून काही धक्कादायक माहिती समोर आली आहे. करोना रुग्णाला रेमडेसिविर इंजेक्शनची गरज भासल्यानंतर त्या रुग्णाच्या नातेवाईकांना गरजेपेक्षा अधिक इंजेक्शन चिठ्ठीवर लिहून दिली जात होती. यातही एक-दोन रेमडेसिविर इंजेक्शन दिल्यानंतर इतर वेळी ‘एमपीएस’ हे दुसरे इंजेक्शन त्याऐवजी दिले जात होते. हे इंजेक्शन कशासाठी वापरतात याबाबत पोलीस अधिक चौकशी करीत आहेत. नवी मुंबईत अनेक टोळ्या कार्यरत असून आतापर्यंत पोलिसांनी चार जणांना जेरबंद केले आहे. याबाबत अधिक तपास पोलीस करीत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 28, 2021 1:52 am

Web Title: two nurse arrested for illegal remdesivir sale zws 70
Next Stories
1 ३८९ इमारती प्रतिबंधमुक्त
2 दोन टँकर प्राणवायू मुंबईत
3 रुग्णसंख्येत घट; पण..
Just Now!
X