गुजरात येथील हापा स्थानकातून रविवारी सायंकाळी महाराष्ट्रासाठी द्रवरूप प्राणवायू घेऊन निघालेली प्राणवायू एक्स्प्रेस सोमवारी सकाळी १० वाजता कळंबोली स्थानकात पोहोचली.

तीन टँकरमधून सुमारे मेट्रिक टन द्रवरूप प्राणवायू कळंबोली स्थानकात पोहोचल्यावर रेल्वे आणि परिवहन विभागाच्या मदतीने ते रेल्वेच्या मालधक्क्यावरून रस्त्यावर सुरक्षितपणे उतरविण्यात आले. यातील प्रत्येक टँकरमध्ये १५ टन प्राणवायू असून एक टँकर पुणे येथे आणि उर्वरित दोन अन्न-औषध प्रशासनाच्या निर्देशाने मुंबईतील प्राणवायूची गरज असलेल्या ठिकाणी पोहोचविण्यासाठी परिवहन विभागाने प्राणवायू कॉरिडॉर बनविले होते. विनाअडथळ्याचा प्रवास असण्यासाठी स्थानिक वाहतूक विभाग आणि परिवहन विभाग यांच्यामध्ये समन्वय साधण्यात आल्याची माहिती परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

गुजरात येथील जामनगर येथील कंपनीतून हा प्राणवायू आणण्यात आला आहे. यापूर्वी कळंबोली येथील मालवाहू रेल्वेसेवेतून विशाखापट्टणम येथून प्राणवायू आणण्यासाठी टँकर पाठविण्यात आले होते. मात्र विशाखापट्टणम येथून प्राणवायू घेऊन आलेले टँकर कळंबोली स्थानकात मुंबईसाठी आले नसल्याचे रेल्वेच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. संबंधित प्राणवायूने भरलेले टँकर थेट नागपूर व इतर ठिकाणी पाठविण्यात आले होते.

प्राणवायू एक्स्प्रेस कॉरिडॉर

१६ तासांत प्राणवायू एक्स्प्रेसने ८६० किलोमीटरचे रेल्वे रुळाचे अंतर पार केले. दुपारी तीन टँकरला कळंबोली स्थानकात उतरण्यासाठी दुपारी अडीच वाजले. मात्र त्यानंतर परिवहन विभाग, अन्न-औषधे प्रशासन आणि वाहतूक पोलिसांच्या संयुक्त समन्वयाने दोन टँकर मुंबईत विविध ठिकाणी जाण्यासाठी महामार्गाला प्राणवायू एक्स्प्रेस कॉरिडॉर हे विशेष रस्त्याचे नियोजन केले होते. याची सर्वाधिक जबाबदारी वाहतूक पोलिसांवर होती. रस्त्यावर कुठेही अडथळा होऊ  नये तसेच कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त वेळेत सुरक्षितरीत्या पार करता यावे असेच नियोजन वाहतूक विभागाने केले होते.