सिडकोचे अद्ययावत प्रदर्शन केंद्र, शंभरपेक्षा जास्त विकासकांचा सहभाग, एकशे साठ स्टॉल्स, दोन हजार कोटीपेक्षा जास्त आर्थिक उलाढालीचा आशावाद, स्टॉल्सच्या सुशोभीकरणावर खर्च होणारे साठ कोटी रुपये, चार दिवसात भेट देणारे हजारो ग्राहक, सिडकोच्या स्मार्ट सिटीचे पुनर्प्रदर्शन आणि यशस्वी आयोजनाचे सोळावे वर्ष असलेले बिल्डर असोसिएशन ऑफ नवी मुंबईच्या लक्षवेधी प्रदर्शनाला आज अत्यंत साधेपणात सुरुवात झाली. बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे आणि सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांच्या उपस्थितीत ह्य़ा महत्त्वाकांक्षी प्रदर्शनाचा शुभारंभ झाला. येत्या दीड महिन्यात नैना क्षेत्रातील पथदर्शी प्रकल्पाला राज्य शासनाची मंजुरी मिळणार, असा आशावाद भाटिया यांनी व्यक्त केला.
मुंबईला पर्याय म्हणून उभे राहिलेल्या नवी मुंबईतील विकासकांनी गेली पंधरा वर्षे आपल्या मालमत्तांचे प्रदर्शन भरविण्यास सुरुवात केली असून, त्याला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. सिडकोच्या वाशी येथील भव्य प्रदर्शन केंद्रात १६० अद्यावत व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विकासकांनी विद्युत रोषणाईत झगमगणारे स्टॉल्स उभे केले आहेत. यात १०३ विकासकांनी भाग घेतला असून काही विकासकांनी भव्य पॅव्हेलियन उभारले आहेत. सोमवापर्यंत सुरू राहणाऱ्या या प्रदर्शनात सुमारे दोन हजार कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल होईल, असा आशावाद माजी अध्यक्ष देवांग त्रिवेदी यांनी व्यक्त केला आहे. ही उलाढाल एका दिवसात होणार नाही. ती पूर्ण वर्षभर सुरू राहणारी प्रक्रिया असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या प्रदर्शनात परवडणाऱ्या घरांना जास्त मागणी राहील असे त्यांनी सांगितले. भाटिया आणि म्हात्रे यांनी तब्बल चार तास संपूर्ण प्रदर्शनाची पाहणी केली. सिडकोच्या प्रकल्पांचा मोफत स्टॉल्स लावल्याने भाटिया यांनी इतका वेळ खर्च केल्याचे नंतर स्पष्ट झाले.
राजकीय मंडळींना दूर ठेवणार
नवी मुंबईतील बिल्डरांचे मालमत्ता प्रदर्शन म्हणजे राजकीय पक्षांची मांदियाळी मानली जात होती, मात्र यावर्षी प्रथमच एका सनदी अधिकाऱ्याच्या हातून या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. त्यामुळे नवी मुंबईच्या राजकीय क्षितिजावर नेहमी चमकत राहणारे नाईक कुटुंबीय या उद्घाटन सभारंभापासून दूर राहिल्याचे दिसून आले. यानंतर हीच पद्धत स्वीकारली जाईल, असे असोशिएशनचे प्रवक्ते देवांग त्रिवेदी यांनी स्पष्ट केले.
नैनाचा पहिला विकास आराखडा १५ फेब्रुवारीपर्यंत
रायगड जिल्ह्य़ातील २७० गावांचा समावेश असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रभावित क्षेत्राचा (नैना) विकास आराखडा तयार करण्याचे काम राज्य शासनाने सिडकोला दिले असून, त्यातील पनवेल तालुक्यातील २३ गावांचा समावेश असलेल्या ग्रीन सिटीचा एक आराखडा सिडकोने शासन मंजुरीसाठी पाठविला आहे. गेले साडेतीन महिने हा आराखडा मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी या आराखडय़ाविषयी चर्चा केली. त्यावेळी १५ फेब्रुवारीपर्यंत या आराखडय़ास मंजुरी दिली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे भाटिया यांनी सांगितले. या मंजुरीवर अनेक विकासकांच्या नजरा खिळल्या आहेत.
मजुरांसाठी कामगार नगरी उभारणार
नवी मुंबईचा विकास झपाटय़ाने होत असून, त्यात आता नैना क्षेत्राची भर पडली आहे. त्यामुळे मजूर, कामगारांची रेलचेल मोठय़ा प्रमाणात शहरात पुन्हा वाढणार आहे. त्या मजूर व कामगारांनी झोपडय़ा बांधून न राहता त्यांच्यासाठी कायमस्वरूपी संक्रमण शिबीर बांधण्याचा प्रस्ताव बिल्डर असोशिएशनचे माजी अध्यक्ष भूपेंद्र शाह यांनी मांडला आहे. त्याला भाटिया यांनी अनुकूलता दर्शविली असून जमीन सिडकोची आणि बांधकाम विकासकांचे आशा तत्त्वावर ही कामगार नगरी बांधण्याचा विचार यावेळी व्यक्त करण्यात आला.