दोन आरोपींकडून ४ लाख २५ हजारांचा ऐवज हस्तगत

नवी मुंबई : केवळ मौजमस्तीसाठी दुचाकी व मोबाइल चोरणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून दोन्ही आरोपी अल्पवयीन आहेत. त्यांच्याकडून मोबाइल आणि दुचाकी असा ४ लाख २५ हजारांचा माल हस्तगत केला आहे.

पनवेल उरण परिसरात मोबाइल आणि दुचाकी चोरीच्या घटना वाढत असताना त्याबाबत गोपनीय पद्धतीने शोधकार्य सुरू होते. दरम्यान हवालदार लक्ष्मण कोपकर यांना दोन अल्पवयीन मुलांविषयी गोपनीय माहिती मिळाली. सविस्तर तपास केला असता ही दोन मुले थोडय़ा-थोडय़ा दिवसांनी वेगवेगळी दुचाकी तसेच महागडे मोबाइल वापरत असल्याचे समोर आले. याच संशयावरून दोघांनाही ताब्यात घेण्यात आले. ज्यावेळी त्यांना ताब्यात घेतले त्याहीवेळी त्यांच्याकडे एक महागडी दुचाकी होती. पोलिसी खाक्या दाखविल्यावर त्यांनी दुचाकी चोरीची कबुली दिली.

तसेच ताब्यात घेताना ज्या दुचाकीवर ते होते ती दुचाकीही चोरीची असल्याचेही त्यांनी पोलिसांना सांगितले. तसेच अन्य आठ दुचाकी चोरल्याचीही कबुली त्यांनी दिली. याशिवाय ९५ हजार किमतीचे सहा मोबाइलही त्यांच्याकडून जप्त करण्यात आले आहेत.

एखादी व्यक्ती मोबाइलवर बोलत चालली असेल वा कारमध्ये बसून खिडकीजवळ मोबाइलवर बोलत असेल तर दुचाकीवर सुसाट येत मोबाइल चोरी करायचा अशी त्यांची पद्धत आहे. मोबाइल चोरी केल्यावर वा पेट्रोल संपत आल्यावर बामण डोंगरी रेल्वेस्थानकात दुचाकी पार्क करून निघून जात होते. त्यांच्याकडून ३ लाख ३० हजारांच्या ८ दुचाकी व ९५ हजारांचे सहा मोबाइल असा ४ लाख २५ हजारांचा माल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त बिपिनकुमार सिंह यांनी दिली. या अल्पवयीन आरोपींनी पनवेल शहर – २, पनवेल  – १ , खारघर रबाळे, उरण न्हावाशेवा आणि खांदेश्वर पोलीस ठाणेअंतर्गत प्रत्येकी एक दुचाकी दुचाकी चोरी केली होती तर उलवे, सानपाडा, कळंबोली वाशी येथे प्रत्येकी १ तर खारघर येथे २ मोबाइल चोरी केल्याचे उघड झाले आहे.