उरण तालुक्यात २०१४ मध्ये झालेल्या तरुणीच्या विनयभंगप्रकरणी रूपेश रमेश म्हात्रे या तरुणाला उरण न्यायालयाने दोन वर्षांंची सक्तमजुरी आणि सात हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

उरणमध्ये राहणारा रूपेश म्हात्रे हा रस्त्यातून ये-जा करणाऱ्या या तरुणीची नेहमी छेड काढत असे, त्यामुळे तरुणी व तिचे कुटुंबीय त्रस्त झाले होते. या प्रकरणी उरण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच गुन्ह्य़ाचा तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक आर.व्ही.थोरात यांनी केला. तपासात रूपेश याच्या विरुद्ध अनेक पुरावे हाती लागले.  हे पुरावे थोरात यांनी न्यायालयात सादर केले. न्यायालयाने पोलीस तपास आणि पुरावे ग्राह्य़ मानून रूपेश याला दोन वर्षांची शिक्षा आणि सात हजार रुपयांच्या दांडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास अधिक सहा महिन्यांची शिक्षा भोगावी लागेल असे न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे. न्यायालयाच्या या निर्णयाचे उरणमधील जनवादी महिला संघटनेच्या रायगड जिल्हा संघटक हेमलता पाटील यांनी स्वागत केले आहे. तसेच महिलांवर वाढलेल्या अत्याचाराला अशा शिक्षांमुळे आळा बसण्यास मदत होईल, असेही मत व्यक्त केले आहे.