खाचखळगे, गवत, कचऱ्यामुळे खेळाडूंचे हाल; नवी मुंबई महापालिकेचे  दुर्लक्ष

‘फिफा’च्या १७ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेसाठी सोयी-सुविधा देण्यावर कोटय़वधी रुपये खर्च करणाऱ्या नवी मुंबई महापालिकेने शहरातील खेळाच्या मैदानांकडे मात्र पूर्ण दुर्लक्ष केले आहे. अनेक मैदानांत खाचखळगे आहेत, सहा फूट उंच गवत वाढले आहे, मैदानांच्या कचराकुंडय़ा झाल्या आहेत, मात्र आंतरराष्ट्रीय खेळाडूंसाठी लाल गालिचा अंथरणाऱ्या पालिकेला शहरातील खेळाडूंशी मात्र काहीच देणे-घेणे नसल्याचे दिसते.

नवी मुंबई शहराची लोकसंख्या झपाटय़ाने वाढत आहे. २०११ साली झालेल्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या ११ लाख होती. आज ती १५ लाखांच्या वर गेली आहे, मात्र त्यांच्यासाठी पुरेशी मैदाने नाहीत. नवी मुंबई शहरात नेरुळ, बेलापूर, वाशी, कोपरखैरणे, तुर्भे, ऐरोली, घणसोली, दिघा अशा आठ विभाग कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात विविध मैदाने आहेत. बेलापूरमध्ये राजीव गांधी स्टेडिअमचा कायापालट करण्यात आला आहे, मात्र हा अपवाद वगळता, अन्यत्र सुविधांची वानवाच आहे. मैदाने विविध सांस्कृतिक, राजकीय कार्यक्रमांसाठी आणि विवाहसमारंभांसाठी भाडय़ाने दिली जातात. कार्यक्रम झाल्यानंतर तिथे मोठय़ा प्रमाणावर कचरा पडलेला असतो. खेळाडू स्वत:च मैदानाची साफसफाई करतात आणि खेळतात. अनेक शाळांना क्रीडांगणेच नाहीत, तर काही शाळांची मैदाने पार्किंगने अडवली आहेत.

बेलापूरमधील सुनील गावसकर मैदान, सीवूड्स येथील गणपतशेठ तांडेल मैदान, नेरुळ सेक्टर २६ मधील बामणदेव झोटिंगदेव मैदान, करावे गावाजवळील स्वर्गीय दिनकर बारशा पाटील मैदान, वाशी सेक्टर नऊ मधील नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान या मैदानांची देखभाल दुरुस्ती होणे गरजेचे आहे. करावे गावाजवळील स्व. दिनकर बारशा मैदानाला गुरचरण जमिनीचे रूप आले आहे. त्याच्या नावाचा फलकही वेलींनी वेढला आहे. मैदानांचे हस्तांतर करून घेतल्यानंतर पालिकेने त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले. काही ठिकाणी खाचखळगे आहेत, तर काही मैदानांमध्ये प्रवेश कसा करायचा, असा प्रश्न पडावा एवढे

)गवत वाढले आहे. या मैदानांचे सपाटीकरण करावे, नियमित साफसफाई करावी, सुरक्षारक्षक नेमावेत, अशी मागणी नगरसेवक विनोद म्हात्रे यांनी केली आहे. मैदानांच्या देखभालीबाबत अतिरिक्त आयुक्त (सेवा) रमेश चव्हाण यांना विचारणा केली असता त्यांच्याशी संपर्क झाला नाही. शहरातील मैदानांची देखभाल दुरुस्ती व्हावी यासाठी परिमंडळनिहाय संस्थांची नेमणूक करण्यासंदर्भात पालिका स्तरावर विचारविनिमय झाला होता, मात्र त्यावर पुढे काहीही कार्यवाही झाली नाही.

खेळाच्या मैदानांची देखभाल दुरुस्ती करण्याची जबाबदारी अभियंता विभागाची आहे. या विभागाने मैदाने सुव्यवस्थित ठेवली पाहिजेत. तिथे खेळाडूंसाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत.

– संदीप संगवे, क्रीडा विभाग प्रमुख

शहरातील अनेक मैदाने खेळण्यायोग्य नाहीत. पालिकेने त्यांची देखभाल दुरुस्ती केली पाहिजे. नेरुळमधील बामणदेव झोटिंगदेव मैदानही व्यवस्थित करायला हवे.

– गिरीश म्हात्रे, नगरसेवक

मैदानांची संख्या

* शहरातील खेळाची मैदाने-      ५८

*  परिमंडळ -१ मधील मैदाने-    ३४

*  परिमंडळ-२ मधील मैदाने-     २४

* पालिका शाळांची मैदाने-       २८

* परिमंडळ १ पालिका शाळांची मैदाने- १६

*  परिमंडळ -२ पालिका शाळांची मैदाने- १२