पनवेल महापालिकेची किरवलीत १७५ घरांवर कारवाई

पनवेल : पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील किरवली गावातील ठाकूरपाडा येथे बांधण्यात येत असलेल्या चाळवजा बैठय़ा घरांवर बुधवारी पनवेल पालिकेने कारवाई केली. या भागात सुमारे ५०० अनधिकृत घरे बांधण्यात येत होती. ही घरे काही लाखांत विकून चाळमाफिया गरिबांची फसवणूक करत असल्याचे निदर्शनास येताच पनवेल महानगरपालिकेने ही घरे जमीनदोस्त केली.

पनवेल परिसरातील विकास प्रकल्पांमुळे येथील घरांचे भाव वाढत आहेत. याचाच गैरफायदा घेत चाळ माफिया पनवेल शहराच्या आसपास बैठी घरे बांधून ती सुमारे पाच ते सहा लाखांना विकत आहेत. याबाबत पनवेल महानगरपालिकेला माहिती मिळाली असता  पनवेलचे आयुक्त दीपक देशमुख यांच्या आदेशानुसार या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली.

या कारवाईत जेसीबीच्या माध्यमातून १७५ घरे जमीनदोस्त करण्यात आली. उपायुक्त जमीर लेंगरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग अधिकारी श्रीराम हजारे, गणेश साळवे, इंजिनीयर राजेश कर्डिले, निशांत औसरमल, अधीक्षक संजय देशमुख यांच्या पथकाने ही कारवाई केली. अशा प्रकारे पनवेल महानगरपालिका हद्दीत कोणतेही अनधिकृत बांधकाम खपवून घेतले जाणार, नाही असे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी सांगितले. त्यामुळे यापुढे पनवेल पालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर बडगा उचलला जाण्याची शक्यता आहे.