वाशी स्थानकाजवळील भूखंडावर डेब्रिजचे ढीग

स्वच्छतेत शहराचा देशात पहिला क्रमांक यावा यासाठी पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत झटणाऱ्या नवी मुंबईत वाशीसारख्या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकाजवळ उच्चविद्युत दाबाच्या वाहिन्यांखालील भूखंडावर कचऱ्याचे ढीग साचले आहेत. काही भूखंडावर डेब्रिजचे ढिगारे साचले असून वाशी गावाच्या दिशेकडील भूखडांवर बेकायदा झोपडय़ाही मोठय़ा संख्येने निर्माण झाल्या आहेत. पालिकेचे याकडे दुर्लक्ष होत आहे.

नवी मुंबई शहरात सिडकोचे अनेक भूखंड पडून आहेत. अनेक भूखंडांवर बेकायदा झोपडय़ा वसल्या आहेत. वाशी स्थानकातून वाशी गावच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यालगत उच्च विद्युतदाबाच्या वाहिन्यांखाली अनेक भूखंड आहेत. त्या ठिकाणी उघडय़ावर कचरा टाकला जात होता. मॉलबाबत पालिकेने कडक धोरण घेतल्यावर मॉल प्रशासनाने ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यास सुरुवात केली आहे. परंतु मॉलच्या बाजूला असलेल्या भूखंडावर सुक्या कचऱ्याचे ढीग साचलेले दिसतात. या ठिकाणी कचरा वर्गीकरणाचे काम करणाऱ्यांना प्रत्येकी २०० रुपये दिले जातात, अशी माहिती तेथील एका कामगाराने दिली या ठिकाणी प्लास्टिक वेगळे करून ते विकले जाते. परंतु उघडय़ावरच हा सगळाप्रकार सुरू असून त्यामुळे शहर सौंदर्याला बाधा येत आहे. याच परिसरातील अस्वच्छतेमुळे डुकरांची संख्या वाढली आहे.

याच परिसरात एमएसईबीच्या एका भूखंडावरही सर्वत्र कचरा व डेब्रिज पडले आहे. उच्च विद्युत दाब वाहिन्यांखाली असलेल्या भूखंडांच्या मागील बाजूस मोठी बेकायदा झोपडपट्टी वसली आहे. या झोपडय़ांवर कारवाई केल्यानंतरही तिथे पुन्हा झोपडय़ा उभ्या राहिल्या आहेत. शहरात ब्लँकेट विकणारे या वस्तीत राहतात. हिवाळा वाढल्यापासून या विक्रेत्यांची संख्या आणि परिणामी झोपडय़ा वाढल्या आहेत.

रघुलीला मॉलशेजारील भूखंडावर जिथे सुका कचरा टाकला जातो, त्या भागाची पाहणी केली आहे. या ठिकाणी कचऱ्यातून प्लास्टिक वेगळे करण्याचा बेकायदा उद्योग सुरू आहे. हे प्लास्टिक चेंबूर आणि अन्य ठिकाणी विकले जाते. हे उघडय़ावरच सुरू असल्यामुळे शहर सौंदर्यास बाधा निर्माण होत आहे. त्यांना हटविण्यात येईल. बेकायदा झोपडय़ांवर यापूर्वीही कारवाई करण्यात आली होती. पुन्हा कारवाई केली जाईल.     – महेंद्रसिंग ठोके, विभाग अधिकारी, वाशी