कोपरखैरणेत कारवाईदरम्यान पोलीस, सिडको कर्मचाऱ्यांवर हिंसक जमावाचा हल्ला

कोपरखैरणे रेल्वे स्थानकालगत असलेल्या सिडकोच्या भूखंडावरील झोपडय़ांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलीस आणि सिडको कर्मचाऱ्यांवर मंगळवारी हिंसक जमावाने हल्ला केला. त्यात कोपरखैरणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहाजी आवटी यांच्यासह ११ पोलीस कर्मचारी आणि सिडकोचे दोन कर्मचारी जखमी झाले. रहिवाशांनी दगडफेक केली आणि काचेच्या बाटल्या मारल्या. कारवाईसाठी आणलेला जेसीबी बंद पाडून त्याचीदेखील मोडतोड केली. दीडशे झोपडय़ा तोडण्यासाठी दंगलविरोधी पथकासह प्रचंड फौजफाटा तैनात करून कारवाई पूर्ण करण्यात आली.

कोपरखैरणे सेक्टर आठलगत असलेल्या सिडकोच्या भूखंडावर झोपडपट्टी असून दर वर्षी या ठिकाणी जुजबी कारवाई करण्यात येते. तीन वर्षांपूर्वी पूर्ण भूखंड मोकळा करून तिथे कुंपण घालण्यात आले होते, तरीही भूमाफियांनी तिथे पुन्हा झोपडय़ा वसवल्या. मंगळवारी सकाळी पोलिसांच्या उपस्थितीत कारवाई करण्यात आली तेव्हा हिंसक जमावाने पोलीस आणि अन्य कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. सिडकोच्या कारवाईची खबर येथील झोपडीदादांना मिळाली असावी आणि त्यामुळे त्यांनी हल्ला करण्याचे ठरवले असावे, असा अंदाज, सिडकोच्या एका अधिकाऱ्याने व्यक्त केला.

कारवाई सुरू होताच शीतपेयांच्या बाटल्या भिरकावण्यात आल्या. या बाटल्यांमध्ये तिखट पावडर भरण्यात आली होती. शिवाय दगडफेकही करण्यात आली. दगडफेक सुरू झाल्यामुळे पळापळ आणि आरडाओरडा सुरू झाला. पोलिसांकडे महिला पोलिसांची कमतरता होती आणि झोपडपट्टीवासीयांनी नेमके हेच हेरत महिलांना पुढे केले. महिलाच समोर आल्यामुळे पोलिसांच्या कारवाईवर मर्यादा आल्या.

हल्ल्याबाबत माहिती मिळताच राज्य राखीव दलाची तुकडी, दंगलरोधक वाहन रवाना करण्यात आले. अश्रुधुराच्या नळकांडय़ा घेऊन पोलीस घटनास्थळी धडकले. हल्लेखोरांपैकी ३० जणांना ताब्यात घेण्यात आले. जखमी झालेल्यांवर वाशीतील पालिका रुग्णालयात उपचार करून सोडण्यात आले.

कारवाई झाली त्या ठिकाणी १२ निवासी भूखंड असून सहा भूखंडांची विक्री झाली आहे, मात्र या भूखंडांवर अतिक्रमण झाले होते, त्यामुळे कारवाई करण्यात आली. कारवाई होताच भूखंड संबंधितांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.    – संजय धोंडे, वरिष्ठ भूमापन अधिकारी

रहिवाशांनी कायदा हातात घेऊन दगडफेक केली. त्यात कोपरखैरणेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह अनेक कर्मचारी जखमी झाले. २५-३० जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. पूर्ण तपास करून योग्य ती कारवाई करण्यात येईल.     – डॉ. सुधाकार पठारे, पोलीस उपायुक्त, परिमंडळ १

पावसाळ्याच्या तोंडावर ही कारवाई करून आम्हाला बेघर केले आहे. आम्ही दरमहा वीज देयक भरतो. घरभाडेही देतो कोणतीही नोटीस न बजावता हि कारवाई करण्यात आली आहे.  – गंगा यादव, रहिवासी

सिडकोच्या अतिक्रमण प्रतिबंधक विभागाकडून या भूखंडावर दर सहा महिन्यांनी कारवाई केली जाते. तरीही हे झोपडपट्टीधारक वारंवार ठाण मांडतात. या वेळी पूर्ण भूखंड मोकळा करण्यात आला आहे. पुन्हा अतिक्रमण होऊ नये, यासाठी कम्पाऊंड बांधण्यात येणार आहे.   – बी. बी. राजपूत, मुख्य अभियंता, अतिक्रमण प्रतिबंधक विभाग, सिडको