पनवेल पालिकेची स्वच्छ पनवेल, सुंदर पनवेलमोहीम

पनवेल शहरात दुकानदारांनी वाढीव बांधकामे करीत पदपथही काबीज केले आहेत. त्यांच्याविरोधात पनवेल महापालिकेने गुरुवारपासून मोहीम हाती घेतली असून पहिल्याच दिवशी  ५० बेकायदा दुकाने जमीनदोस्त करण्यात आली.

येत्या दहा दिवसांत अशी बेकायदा वाढीव बांधकामांवर कारवाई करण्यात येणार आहे. बेकायदा बांधकामांमुळे पनवेल शहराला बकाल स्वरूप आले आहे. दुकानासमोर पत्र्याच्या शेड, कठडे आणि भिंती चढविण्यात आल्याने चालण्यासाठीचे पदपथही गिळंकृत केले आहेत. त्यामुळे शहरात वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. त्यामुळे पालिकेने ही कारवाई सुरू केली आहे. गुरुवारी पळस्पे, काळुंद्रे, भिंगारी येथील रस्त्यावर बेकायदा बांधकाम केलेल्या दुकानांचे ५० पेक्षा अधिक गाळे तोडण्यात आले. या कारवाईचे पनवेलकरांकडून स्वागत होत असून शहराची कोंडी काही अंशी तरी सुटेल, अशी आशा व्यक्त केली आहे.

‘स्वच्छ पनवेल, सुंदर पनवेल’ अशी मोहीम पालिकेने हाती घेतली आहे. याला अतिक्रमणामुळे खोडा निर्माण होत असल्याने कुणाचीही गय केली जाणार नाही. कारवाईनंतर पुन्हा बेकायदा बांधकामे केल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल.   जमीर लेंगरेकर, उपायुक्त , पनवेल महापालिका