बेलापूरच्या किनाऱ्यावर डेब्रिजचा भराव; पालिका अधिकारी, लोकप्रतिनिधींशी संगनमत

मुंबईतील डेब्रिज शेजारच्या नवी मुंबईत आणून टाकण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. बेलापूरच्या खाडीकिनारी खारफुटीवर डेब्रिज टाकून मोठे गॅरेज तयार करण्यात आले आहे. त्यावर गुरुवारी कारवाई करण्यात आली. अन्यत्र मात्र पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. शहरात ठिकठिकाणी डेब्रिजचे डोंगर साचले आहेत.

वाशी व ऐरोलीमार्गे रात्रीच्या वेळी मोठय़ा प्रमाणात डेब्रिज आणून टाकण्याचा धंदा गेली १० वर्षे राजरोस सुरू आहे. यासाठी मुंबईत डेब्रिजची वाहतूक करणारे कंत्राटदार नवी मुंबईतील नगरसेवक, पत्रकार, स्थानिक नेते, त्यांचे कार्यकर्ते आणि निकटवर्तीय यांच्याशी संधान बांधत असल्याचे सांगितले जाते. प्रत्येक गाडीमागे १०० रुपयांपासून ५०० रुपयांपर्यंत रक्कम ठरवण्यात येते. हे माफिया नवी मुंबईतील मोकळ्या जागा दाखवतात आणि तिथे रातोरात डेब्रिजच्या गाडय़ा रित्या केल्या जातात, असे सांगितले जाते.

शहरात मोठय़ा प्रमाणात येणाऱ्या डेब्रिजला पायबंद बसावा यासाठी डेब्रिज नियंत्रण पथकाची स्थापना करण्यात आली आहे. १०० किलोमीटरपेक्षा जास्त क्षेत्रफळातील डेब्रिज माफियांवर लक्ष ठेवण्यासाठी या पथकाला एकच गाडी देण्यात आली आहे. या पथकातील काही कर्मचाऱ्यांचे भूमाफियांबरोबर साटेलोटे झाल्याचे सांगितले जाते. त्यामुळे प्रभागातील सर्व गैरप्रकारांवर लक्ष ठेवणाऱ्या प्रभाग अधिकाऱ्यांची जबाबदारी वाढत आहे. ते ही जबाबदारी झटकून मोकळे होते असल्याने नेरुळ प्रभाग कार्यालयाच्या मागे डेब्रिजचे डोंगर तयार झाले आहेत. भूमफिया प्रभाग अधिकाऱ्यांनाही नैवद्य दाखवत असल्याची चर्चा आहे. माजी पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या १० महिन्यांच्या कार्यकाळात या पथकाने कडक कारवाई केली होती.

नवी मुंबईच्या विकास प्रकल्पांतूनही दिवसाला ५०-६० गाडय़ा डेब्रिज तयार होते. त्यांच्यावर कारवाई करून दिखावा केला जातो. मुंबईहून मोठय़ा प्रमाणात येणाऱ्या डेब्रिजवर मात्र हे पथक कारवाई करताना दिसत नाही. बेलापूर सेक्टर-११ येथील खाडीकिनारी गेले चार दिवस शेकडो वाहने डेब्रिज येऊन पडत होते. पालिका मुख्यालयासमोरूनच या डेब्रिजच्या गाडय़ांची ये-जा सुरू होती. खारफुटीवर भराव टाकून भूखंड तयार करण्याचे काम दिवसरात्र सुरू होते.

या ठिकाणी मुंबईतील एका गॅरेजवाल्याला ट्रकच्या गॅरेजसाठी जागा तयार करून देण्याचे आश्वासन येथील एका नेत्याने दिले असल्याची चर्चा होती. पालिकेच्या पथकाने या भरावाकडे दुर्लक्ष केले होते. स्थानिक नागरिकांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी पालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या निदर्शनास ही बाब आणली.

खाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी चर खणून ट्रक जाणार नाहीत. याची व्यवस्था केली. तोपर्यंत या खाडीकिनारी अर्धा भराव टाकण्यात आला होता.

तुर्भे येथील डेब्रिज माफियांच्या मागे शिवसेना नगरसेवकाच्या भावाचा वरदहास्त असल्याची चर्चा आहे. तो एका गाडीमागे ३०० रुपये घेत असल्याचे सांगितले जाते. दिवसाला १०० गाडय़ा रिकाम्या झाल्यानंतर संध्याकाळी तात्काळ या नगरसेवक बंधूच्या खिशात ३० हजार रुपये जमा होत आहेत. हाच प्रकार मुंबईतून येणाऱ्या बहुतांशी सर्वच डेब्रिज गाडय़ांबाबत असून हा दर वाहतुकीच्या अंतरानुसार १०० ते ५०० रुपये आकारला जातो. या पैशांतून हे डेब्रिजमाफिया पालिकेचे प्रभाग अधिकारी व दक्षता पथकाच्या कर्मचाऱ्यांना मॅनेज करीत असल्याचे समजते. या गोरखधंद्यांकडे पालिकेचे आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

डेब्रिज टाकलेली ठिकाणे

  • एमआयडीसीतील मोकळ्या भूखंडांवर भराव टाकण्यात येत आहे. तुर्भे-इंदिरानगर येथील पावसाळी नाला भराव टाकल्यामुळे बुजला आहे. याच इंदिरानगरच्या पुढे दगडखाणी परिसरात गणपती पाडा येथेही मोठय़ा प्रमाणात डेब्रिज टाकण्यात आले आहे.
  • नेरुळ येथील सीवूड्स परिसरातही डेब्रिजचे साम्राज्य आहे.
  • अडवली भुतवली या अदिवासी भागात तर डेब्रिजचा खच पडला आहे. डोंगराच्या कुशीतील मोकळी जागा या डेब्रिजमुळे भरून गेली आहे.

परवानगीशिवाय डेब्रिज टाकणाऱ्यांवर पालिका कारवाई करत आहे. पूर्वीपेक्षा हे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे डेब्रिजवर नियंत्रण आले आहे. स्थानिक कामातही मोठय़ा प्रमाणात डेब्रिज तयार होत आहे. सगळे डेब्रिज मुंबईहूनच येते, असे नाही. पालिका ही कारवाई अधिक तीव्र करणार आहे.  – तुषार पवार, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) नवी मुंबई पालिका