संतोष जाधव

आयुक्तांचा अधिकाऱ्यांना इशारा

नवी मुंबईत परवानगीशिवाय डेब्रिज टाकणाऱ्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर पालिका आयुक्त रामास्वामी एन. यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. जबाबदार अधिकाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या असून यापुढे कर्तव्यात हलगर्जी केल्यास निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. नोटिसा बजावलेल्या अधिकाऱ्यांमध्ये विभाग अधिकारी तसेच डेब्रिज पथकावरील नियंत्रण अधिकाऱ्यांचा समावेश आहे. बेकायदा डेब्रिजसह अनधिकृत बांधकामाकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवरही यापुढे कडक कारवाई करण्यात येईल, असे संकेत आयुक्तांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिले.

वाशी व ऐरोली पुलावरून रात्री मोठय़ा प्रमाणात डेब्रिजची वाहतूक केली जाते. शहराच्या विविध भागांत डेब्रिज टाकल्याचे दिसते. सीवूड्स, नेरुळ, बेलापूर खाडी, एनआरआय खाडीकिनारा, नेरुळ होल्डिंग पॉण्ड, जुईनगर रेल्वे कॉलनीमागील खाडी किनारा, एमआयडीसीतील मोकळे भूखंड, गणेश तांडेल मैदान यासह शहरात विविध ठिकाणी डेब्रिज माफियांनी धूमाकूळ घातला आहे. रोज नवनवीन ठिकाणी डेब्रिजचे ढिगारे साचत असताना, पालिकेच्या डेब्रिजविरोधी भरारी पथकांना मात्र डेब्रिज वाहून आणणारी वाहने दिसतच नाहीत.

शहरात डेब्रिज आणणाऱ्यांकडे डेब्रिज कुठे टाकणार याची माहिती आणि परवानगी असणे आवश्यक असते. पालिका क्षेत्रातून जाणाऱ्या या गाडय़ांकडून परवानगीसाठी प्रतिगाडी शुल्क आकारण्यात येते. विनापरवाना डेब्रिज घेऊन येणाऱ्या वाहनांवर पालिकेने मोठी दंडात्मक कारवाई करणे अपेक्षित असते, मात्र नवी मुंबईत अनेक वाहनांतून डेब्रिज टाकले जात असताना दंडवसुलीची रक्कम मात्र नगण्य आहे. शहरातील मोकळ्या भूखंडांवर आणि खाडीकिनारी दलदलीच्या भागांत डेब्रिज टाकून ते सपाट करून तिथे बेकायदा झोपडय़ा वसवण्यात येत आहेत.

शहरात दोन डेब्रिजविरोधी भरारी पथके आहेत. वाशी व ऐरोली विभागकार्यालयांतर्गत व पालिकेच्या घनकचरा विभागामार्फत  विभाग अधिकाऱ्यांचे त्यांच्यावर नियंत्रण असते, मात्र भरारी पथकाने वर्षभरात केलेल्या कारवाईच्या किती तरी पट डेब्रिज शहरात पडले आहे. त्यामुळे पालिका आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दणका देत नोटीस बजावल्या आहेत.

नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवा तसेच नागरी सुविधांचा दर्जा चांगला असावा, शहर सौंदर्यीकरणाला व नियोजनाला बाधा येईल, अशा बाबींना वेळीच पायबंद घालावा, प्रसंगी कायदेशीर कारवाई करावी ही महानगरपालिकेची भूमिका असून यासाठी सर्व महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी यांनी सतर्क राहावे व आपल्याला नेमून दिलेले काम योग्य रीतीने करावे, अशा सूचना आयुक्तांनी पालिका मुख्यालयात झालेल्या बैठकीत दिल्या. कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला.

पालिकेचे उपाय निष्प्रभ

डेब्रिज टाकणाऱ्यांना पायबंद घालण्यासाठी पालिकेने डेब्रिज टाकल्या जाणाऱ्या भूखंडांवर चर खोदण्याची मात्रा वापरली, मात्र तरीही डेब्रिज टाकण्याचे प्रकार कमी झालेले नाहीत. डेब्रिजमाफिया डेब्रिज टाकण्यासाठी वेगवेगळी ठिकाणे शोधून डेब्रिज टाकू लागले आहेत.

नवी मुंबई शहरात डेब्रिज टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. भरारी पथकाला पोलीस व्यवस्थाही करून दिली होती. तरीही कामात हलगर्जी होत असल्याने १० ते १२ जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यापुढे सुधारणा न दिसल्यास निलंबनाची कारवाई करण्यात येईल. अनधिकृत बांधकामांबाबतही जबाबदार अधिकाऱ्यांनीही योग्य काम करण्याची गरज आहे.    – डॉ. रामास्वामी एन. आयुक्त, नवी मुंबई महापालिका