वाशीतील सतरा प्लाझा या वाणिज्य संकुलाबाहेरील रस्त्यावर पुन्हा पार्किंग करण्यात येऊ लागले आहे. काही महिन्यांपूर्वी पालिकेने येथील बेकायदा पार्किंगविरोधात धडक मोहीम राबवली होती. सलग दोन-तीन महिने कारवाई केल्यानंतर ही समस्या कायमची सोडवण्यासाठी येथे भिंत उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता, मात्र पालिकेने प्रत्यक्षात लोखंडी जाळी लावण्याचा प्रस्ताव संमत करून काम सुरू केले. त्याविरोधात काही व्यावसायिक न्यायालयात गेले आहेत. या दरम्यानच्या काळात इथे पुन्हा बेकायदा पार्किंग सुरू झाले असून त्याचा दुष्परिणाम पाम बीच मार्गावरील वाहतुकीवर होऊ लागला आहे.

पाम बीचवरील व्यावसायिकांच्या याचिकांना दोन प्रकरणांत महापालिकेचे म्हणणे सादर होईपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. दरम्यान, लोखंडी ग्रिल बेकायदा पार्किंग रोखण्यास उपयुक्त ठरणार नसून या ठिकाणी कायमस्वरूपी भिंत बांधण्याचे काय झाले? असा प्रश्न न्यायालयाने विचारला आहे. पाम बीच हा शहरातील वेगवान मार्ग आहे, मात्र सतरा प्लाझाच्या मागील बाजूस या मार्गावर मोठय़ा प्रमाणात पार्किंग केले जात आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. सतरा प्लाझातील व्यावसायिकांनी बांधकाम आराखडा धाब्यावर बसवत दुकाने आणि शोरूम्सची प्रवेशद्वारे मागील म्हणजेच पाम बीच रोडच्या दिशेला बांधली आहेत. तिथूनच ग्राहकांना प्रवेश देण्यात येत आहे आणि पार्किंगही रस्त्यावर केले जात आहे. हे पार्किंग रोखण्यासाठी आणि मागील बाजूची प्रवेशद्वारे बंद करण्यासाठी पालिकेने लोखंडी ग्रिल लावण्याचे काम सुरू केले होते. त्याच वेळी देवेंद्र शर्मा व इतर ३१ जणांनी या ग्रिलविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. पालिकेकडे वापरातील बदलाबाबत अर्जही केले होते; परंतु पालिकेने ते तात्काळ फेटाळले. तसेच पालिकेने नागरिकांच्या ऑनलाइन तक्रारी न्यायालयात सादर केल्या होत्या. त्यानंतर न्यायालयाने या व्यावसायिकांना फटकारले होते. या व्यावसायिकांनी याचिका मागे घेतली, मात्र त्यानंतर इतर व्यावसायिकांनी वाशी न्यायालयात वेगवेगळ्या याचिका दाखल केल्या. तिथेही न्यायालयाने पालिकेचे म्हणणे योग्य ठरवले. या दोन्ही प्रकरणांत पालिकेला म्हणणे मांडण्यास सांगण्यात आले आहे.

ग्रिल निरुपयोगी

पाम बीच मार्गावर पटेल चौक ते कोपरी या १ किमी लांबीच्या परिसरात काम सुरू आहे. या कामासाठी १७ लाख ७८ हजार ८६८ रुपये खर्च येणार आहे. लोखंडी ग्रिल लावले तरी त्यापलीकडे पाम बीच मार्गावर वाहने उभी करून खरेदी, विक्री, दुरुस्ती सुरूच राहणार आहे. त्यामुळे ही समस्या कायमची सोडवण्यासाठी भिंतच बांधणे आवश्यक आहे.

पाम बीच मार्गावर सतरा प्लाझा परिसरात करण्यात येणारे बेकायदा पार्किंग व बेकायदा व्यवसाय याबाबत उपाययोजना करण्यासाठी लोखंडी जाळी लावण्याचे काम सुरू आहे. भिंत बांधण्यास जास्त खर्च होणार होता. त्यामुळे ग्रिलची भिंत बांधण्याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल.

– डॉ. रामास्वामी एन., आयुक्त, नमुंमपा

व्यावसायिकांनी पाम बीच मार्गावर बेकायदा पार्किंग करू नये, यासाठी  पालिकेने उपाययोजना सुरू केल्या आहेत. न्यायालयाने पालिकेचा निर्णय योग्य असल्याचे निरीक्षण नोंदवत दोन याचिकांबाबत आपले म्हणणे मांडण्यास सांगितले आहे. पालिका आपले म्हणणे सादर करणार आहे.

– अभय जाधव, विधि अधिकारी, नमुंमपा

पाम बीच मार्गावरील बेकायदा पार्किंगवर वारंवार कारवाई केली जाते; परंतु या ठिकाणी महापालिकेने ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. वाहतूक विभागामार्फत कारवाई सुरू असते. तरीही पुन:पुन्हा बेकायदा पार्किंग होतेच.

– अभय महाजन, वाहतूक पोलीस अधिकारी, एपीएमसी, वाशी