हरकती सूचनांसाठी आठ दिवसांची मुदत

सीवुड्स रेल्वे स्थानकाच्या पश्चिम भागात वाहने उभी करण्यास वाहतूक विभागाने मनाई केली आहे. त्यासंदर्भात सूचना आणि हरकती सादर करण्यासाठी आठ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. तिथे ग्रॅण्ड सेंट्रल मॉल सुरू झाल्यापासून वाहनांची वर्दळ वाढली आहे, परिणामी मोठय़ा प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे.

नवी मुंबईत सर्वच विभागांत वाहतूक कोंडीची तसेच पार्किंगची मोठी समस्या निर्माण झाली आहे. सीवूड्स पश्चिम परिसरात वर्षभरापूर्वी ग्रॅण्ड सेन्ट्रल मॉल सुरू झाल्यापासून या परिसरात नागरिकांची व वाहनांची मोठी वर्दळ होत आहे. त्यामुळे या परिसरात रस्त्याच्या दुतर्फा वाहने पार्क केली जातात. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होत असून वाहतूक कोंडीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या परिसरात असलेल्या बसथांब्यांसमोरही दुचाकी तसेच चारचाकी वाहने पार्क केली जातात.

याबाबत सीवूड्स वाहतूक विभागाकडे नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्या. एल अ‍ॅण्ड टी सीवूड्स, दारावे पूल सेक्टर ४२ ते अभिषेक इमारत सेक्टर ४०, संजय जोशी चौक यादरम्यान समांतर पार्किंग करण्याची अधिसूचना वाहतूक विभागाकडून २०१६ मध्येच काढण्यात आली होती. परंतु या ठिकाणी समांतर पार्किंग केले जात नसून,  बेशिस्तपणे वाहने पार्क केली जात आहेत. त्यामुळे आधीची अधिसूचना रद्द करून या मार्गावर समांतर पार्किंगऐवजी नो पार्किंग घोषित करण्याचा प्रस्ताव वाहतूक विभागाने तयार केला आहे. या प्रस्तावाबाबत काही हरकती सूचना असल्यास पोलीस उपायुक्त, वाहतूक विभाग, नवी मुंबई यांच्याकडे हरकती-सूचना करण्याचे आवाहन वाहतूक उपायुक्तांनी केले आहे.

संपर्क

पोलीस उपायुक्त, वाहतूक विभाग, नवी मुंबई कार्यालय, खोली क्रमांक ७३२, सातवा मजला, कोकणभवन विस्तारित इमारत, सेक्टर १० सीबीडी बेलापूर, नवी मुंबई