सीवुड्स पश्चिमेकडील मॉलमध्ये जाणाऱ्या ग्राहकांची वाहने रस्त्यावरच

सीवूड्स रेल्वे स्थानकाच्या पश्चिम भागाप्रमाणे पूर्वेकडेही बेकायदा पार्किंगची समस्या गंभीर झाली आहे. येथील ग्रॅण्ड सेंट्रल मॉलमध्ये येणारे ग्राहक मॉलच्या वाहनतळातऐवजी रेल्वे स्थानकाबाहेरच्या रस्त्यावरच वाहने पार्क करीत आहेत. वाहनतळात पार्किंगसाठी द्यावे लागणारे पैसे वाचवण्याच्या दृष्टिकोनातून रस्त्यावर बेशिस्तपणे पार्किंग केले जात आहे. रेल्वे स्थानकातून ये-जा करणाऱ्यांना आणि या परिसरातील रहिवाशांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.

सीवूड्स पश्चिमेला मोठी लोकवस्ती आहे. सेक्टर ४२, ४४, ४६, ४८, ५० आणि करावे गाव असे मोठे रहिवासी क्षेत्र आहे. पश्चिमेला डी मार्ट आणि ग्रॅण्ड सेंट्रल मॉल यामुळे या भागात ग्राहकांचीही प्रचंड गर्दी असते. सायंकाळी तर रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. मॉलच्या बाहेरच्या मुख्य रस्त्यावर नो पार्किंगचे फलक नाहीत. त्यामुळे वाहनचालक हवे तिथे वाहने उभी करतात. या परिसरातील बसथांब्यांना अघोषित वाहनतळांचे रूप आले आहे. थांब्याच्या समोरच वाहने पार्क करण्यात आल्यामुळे प्रवाशांना बसमधून रस्त्यावरच उतरावे लागते. त्यामुळे अपघातांची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे.

ग्रॅण्ड सेंट्रल मॉलमध्ये पार्किंगची सुविधा आहे. परंतु तिथे जेवढा वेळ वाहन पार्क करायचे आहे, त्यानुसार पैसे मोजावे लागतात. दुचाकीसाठी १० रुपये तर  चारचाकीसाठी ३० रुपये भरावे लागतात. हे पैसे भरणे टाळण्यासाठी रस्त्यांवर खुलेआम पार्किंग केले जात आहे. रस्त्याच्या कडेला पालिका व वाहतूक विभागाने नो पार्किंगचे फलक लावणे आवश्यक आहे. वाहतूक विभागाकडूनही या मनमानी पार्किंगकडे दुर्लक्ष होत आहे. वाहतूक पोलीस कारवाईसाठी आले असता चालक त्यांच्याशी रस्त्यावर नो पार्किंगचा फलक नसल्याच्या मुद्दय़ावर हुज्जत घालतात.

मॉल आणि डीमार्टशिवाय नेरुळ जिमखाना, गणपत तांडेल प्रदर्शन मैदान तिथे होणारे विविध समारंभ यामुळे या भागात रोजच वर्दळ असते. सीवूड्स स्थानकापासून लांब राहणारे दुचाकीवरून स्थानकात येतात आणि वाहन तिथेच पार्क करून मुंबई किंवा अन्य भागांत निघून जातात. त्यानंतर दिवसभर वाहन रस्त्यावरच असते.

रहिवाशांना सोसायटीत प्रवेश मिळेना!

सीवूड्स रेल्वे स्थानकाच्या परिसरात राहणाऱ्यांना या बेकायदा पार्किंगचा त्रास सहन करावा लागत आहे. मुख्य रस्त्यावरील पदपथांचा आकार कमी केला व तिथे पार्किंगचे नियोजन केले तर फायदा होईल, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. सोसायटय़ांच्या प्रवेशद्वारांवरच पार्किंग केले जाते. त्यामुळे सोसायटीत प्रवेश करता येत नाही. शिवाय सोसायटीच्या आवारात पार्क केलेली वाहने बाहेर काढण्यात अडथळे येतात. जॅमर लावण्याचे प्रमाण वाढवले पाहिजे, अशी मागणी करण्यात येत आहे.

बेकायदा पार्किंवर वाहतूक पोलिसांमार्फत सातत्याने कारवाई करण्यात येते. सीवूड्स पश्चिमेला मुख्य रस्त्यावर बेकायदा पार्किंग केले जाते. या ठिकाणी लवकरच नो पार्किंगचे फलक लावण्यात यावेत, असे पत्र वाहतूक विभाग तसेच पालिकेला दिले आहे.

– नंदकुमार कदम, वाहतूक विभाग

रस्त्याच्या दुतर्फा पार्किंग केले जात आहे. मॉलमध्ये पार्किंगची सोय आहे परंतु शुल्क आकारले जाते. हे टाळण्यासाठी वाहनचालक रस्त्याच्या कडेला वाहने उभी करतात. पालिका आणि वाहतूक विभागाने ही समस्या सोडवण्यासाठी तात्काळ उपाय करण्याची गरज आहे.

– सुमित्र कडू, विभागप्रमुख, शिवसेना</strong>