24 April 2019

News Flash

सामासिक जागेत पुन्हा पोटदुकाने

नवी मुंबईतील चित्र; पालिकेचे दुर्लक्ष 

नवी मुंबईतील चित्र; पालिकेचे दुर्लक्ष 

तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या काळात फुटपाथ व दुकानांबाहेरील सामासिक जागेने मोकळा श्वास घेतला होता, मात्र आता पुन्हा दुकानदारांनी हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. या जागेत ‘पोटदुकाने’ उभारली आहेत. शहरातील आठही विभागांत हे चित्र असून नागरिकांना रस्त्यावरून चालावे लागत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्नही निर्माण होत आहे. पालिकेचे मात्र, याकडे दुर्लक्ष होत आहे.

दुकानाबाहेरच्या जागेवर दुकानदार सामान ठेवलेल्या व  दुकानाबाहेर पत्रा टाकून बाहेरची जागा दुसऱ्या छोटय़ा व्यवसायासाठी भाडय़ाने देण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. वाशी विभागातील रेल्वेस्टेशन परिसरातील सिडकोच्या किऑस्क एरियामध्ये खुलेआम पोटभाडेकरू ठेवून व्यवसाय केला जातो. दिवाळीच्या निमित्ताने बहुतांश व्यावसायिकांनी दुकानाबाहेरील जागेचा वापर केला आहे. मुंढेंच्या या सामासिक जागेवरील कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले होते. डॉ. रामास्वामी यांनीही तोडक कारवाई केली, परंतु आता या जागेचा वापर होऊ लागला आहे.

अनेक हॉटेल व्यवसायिकांनी तात्पुरते गुंडाळलेले शेड पुन्हा मार्जिनल स्पेसवर आणले आहेत. सायंकाळ होताच बिनादिक्कत जागा अडवण्याचे काम वेगात सुरू होते. कारवाई होईल म्हणून टेबल लावून व्यवसाय करणाऱ्यांनी आता बंद केलेल्या हातगडय़ा सुरू केल्या आहेत. दुकानाबाहेरील जागेत पत्रे टाकून व्यवसाय केला जात आहे. वाशी या मध्यवर्ती ठिकाणी मोठय़ा प्रमाणात हा प्रकार सुरू आहे.

सिडकोचेही दुर्लक्ष

वाशी रेल्वे स्थानकाच्या बाहेरील किऑस्कमध्ये मोठय़ा प्रमाणात उघडय़ावरच गॅस सिलेंडरचा वापर करून पोट व्यवसाय थाटले आहेत. एका छोटय़ा पानटपरीचेही ७ ते ८ हजार रुपये भाडे घेतले जाते. तर  विविध विभागांत दुकानाबाहेरच्या व्यावसायिकाकडून ३ ते ७ हजार पोटभाडे आकारले जात आहेत.

शहरातील सामासिक

जागेचा वापर करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येते. वाशीमध्ये दिवाळीच्या निमित्ताने अशा जागा अडवणाऱ्यांबरोबरच दुकानाबाहेरची जागा वापरणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येईल.    – महेंद्रसिंग ठोके, विभाग अधिकारी, वाशी

First Published on November 7, 2018 1:07 am

Web Title: unauthorized shops in navi mumbai