23 November 2019

News Flash

अशुद्ध पाणीपुरवठा

जलवाहिनीतून पुरवल्या जाणाऱ्या पाण्याकडे पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास येत आहे.

कोपरखरणेत नळांना हिरवे पाणी येत असून तुर्भे परिसरात पाण्यात अळ्या सापडत आहेत.

कोपरखैरणे परिसरात गढूळ, तर तुर्भेत पिण्याच्या पाण्यात अळ्या

नवी मुंबई : पावसाळा सुरू होताच नवी मुंबईत अशुद्ध पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. कोपरखरणेत गढूळ, हिरवे पाणी येत आहे. तर तुर्भे परिसरातही अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्यावर याचा परिणाम होत आहे. पोटदुखीचे आजार वाढले आहेत.

नवी मुंबई शहराला मोरबे धरणातून पाणीपुरवठा होतो. स्वच्छ पाणीपुरवठा होण्यासाठी जलशुद्धीकरण केंद्र तसेच विविध उपाययोजना केल्या जातात. विशेषत: पावसाळ्यात क्लोरिन, तुरटी यांचे प्रमाण वाढवले जात असून त्या ठिकाणी असलेली जलशुद्धीकरण प्रकल्पाचीही स्वच्छता केली जाते. असे असताना तुरळक पाऊस झाला असतानाच हिरवे पाणी येण्यास सुरुवात झाली आहे.

तुर्भे परिसरात तर गेल्या सहा महिन्यांपासून दूषित पाणीपुरवठा होत आहे. आता तर पिण्याच्या पाण्यात अळ्या सापडत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. जलवाहिनीतून पुरवल्या जाणाऱ्या पाण्याकडे पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास येत आहे. बहुतांश ठिकाणी जलवाहिन्या भूमिगत असून त्या नाले, गटारांच्या शेजारून गेलेल्या आहेत. काही जलवाहिन्यांना गळती असल्याने या गटारातील अस्वच्छ पाणी त्यात मिसळत आहे. त्यामुळे काही ठिकाणी अस्वच्छ पाणीपुरवठा होत आहे.

जलवाहिनीला गळती?

तुर्भे परिसरात नवीन जलवाहिनी टाकण्यात आली आहे. मात्र त्यासाठी खोदलेला खड्डा बुजवण्यात आलेला नाही. अनेक जलवाहिन्या या गटाराखाली गेल्या असून त्या ठिकाणी जलवाहिनीला गळती सुरू आहे. मलनिस्सारण वाहिन्या नसल्याने मल थेट गटारात मिसळत आहे. उघडय़ा गटारालगत असलेल्या जलवाहिनीला गळती असल्याने दूषित पाणीपुरवठा होत असून पाण्यात आता अळ्या सापडत असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले.

मोरबे धरण परिसरात पाणीपुरवठा शुद्ध होण्यासाठी जलशुद्धीकरण केंद्रातून पाण्यावर प्रक्रिया केली जाते. पावसाळ्यात पाण्यात वापरण्यात येणारे क्लोरिन, तुरटीचे प्रमाण वाढविले आहे. वेळोवेळी जलशुद्धीकरण प्रकल्पाचीही स्वच्छता केली जाते. जलवाहिन्यांना कुठे गळती आहे का? त्याची तपासणी करण्यात येईल.

-मनोहर सोनवणे, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग

First Published on June 25, 2019 3:47 am

Web Title: unclean water supply in koparkhairane area zws 70
Just Now!
X