दुर्गंधी पसरत असल्याने रुग्णांकडून नाराजी

नवी मुंबई</strong> : नवी मुंबई पालिकेच्या शहरातील अनेक करोना काळजी केंद्रातील अस्वच्छता वाढू लागली आहे. रुग्णशय्याच्या जवळच थुंकणे, उलटी करणे असे प्रकार होत असून स्वच्छतागृहातही गैरसोयी वाढलेल्या आहेत. वाशी येथील काळजी केंद्र हे राज्यातील एक चांगले काळजी केंद्र म्हणून ओळखले जात असताना या ठिकाणच्या स्वच्छता गृहातील दरवाजे गायब झाले आहेत तर काही ठिकाणी नियमित स्वच्छता होत नसल्याने दुर्गंधी पसरत आहे.

नवी मुंबईत एकूण १२ काळजी केंद्रे आहेत तर तीन समर्पित आरोग्य केंद्रे असून दोन रुग्णालये आहेत. गेल्या वर्षी वाशी येथील सार्वजनिक रुग्णालयाचे करोना रुग्णालयात रूपांतर केल्यानंतर सर्वसाधारण रुग्णांसाठी शहरात एकही पालिकेचे रुग्णालय शिल्लक न राहिल्याने पालिकेने नोव्हेंबरमध्ये ही रुग्णालय पूर्ववत केले. करोना रुग्णालयीन उपचारासाठी पालिकेने खासगी रुग्णालयांबरोबर सामंजस्य करार केला असून अत्यवस्थ व प्राणवायूची आवश्यकता असलेल्या रुग्णांना या खासगी रुग्णालयात स्थलांतरित केले जात आहे. त्यामुळे काळजी केंद्र व प्राणवायू केंद्र ही पालिकेची स्वत:ची आरोग्य व्यवस्था आहे. त्यासाठी नव्याने नोकरभरती करण्यात आली असून त्यांच्यावर येथील स्वच्छतेची जबाबदारी घनकचरा व्यवस्थापन विभागाने सोपविली आहे. या केंद्रामध्ये सध्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढली असून येणारे रुग्ण हे सर्व स्तरातील आहेत. त्यामुळे करोना काळजी केंद्र व तेथील स्वच्छतेची सध्या दुरवस्था झाली आहे. त्याबद्दल आमदार गणेश नाईक यांनीही आयुक्तांकडे तक्रार केली असून वाशी येथील काळजी केंद्रातील जेवणाचा दर्जादेखील घसरला असल्याची तक्रार केली आहे. काही रुग्णांनी याबद्दल तक्रार केली असून आजूबाजूच्या रुग्णांच्या तक्रारी केलेल्या आहेत.

११ रुग्णांना एकच पंखा

काळजी केंद्रात गर्दी वाढू लागल्याने काही रुग्णांची व्यवस्था अतिरिक्त ठिकाणी केल्याचे दिसून येते. या ठिकाणी ११ रुग्णांसाठी एकच पंखा आहे. अंगाची काहिली होत असताना दोन पंख्यांवर रुग्णांनी कसे राहावे. अनेक रुग्ण जागेवरच थुंकत असून शौचालयातील अस्वच्छता तर अधिक आजारी पाडणारी आहे, अशी माहिती वाशी येथील काळजी केंद्रातील एका रुग्णाने दिली.

शौचालयात दुर्गंधी काही ठिकाणी आढळून आलेली आहे. ही स्वच्छता त्वरित केली जात असून काळजी केंद्र सर्वच बाजूने स्वच्छ राहील याची काळजी घेतली आहे. हा आजार अस्वच्छतेमुळे जास्त पसरत असल्याने साफसफाई कर्मचाऱ्यांना सतत सक्रिय राहण्यास सांगण्यात आले आहे. अस्वच्छतेबाबत रुग्णांच्या तक्रारी असल्यास त्या दूर केल्या जातील.

 – डॉ. बाबासाहेब रांजळे, उपायुक्त, नवी मुंबई पालिका