देशात पहिल्या शंभर शहरात समावेश; ८६ वा क्रमांक

नव्यानेच स्थापन झालेली पालिका, त्यात या वर्षी सिडको वसाहतीतील कचरा व्यवस्थापनाची स्वीकारलेली जबाबदारी या आवाहनांना सामोरे जात पनवेल महापालिकेने दुसऱ्या वर्षांत स्वच्छ अभियानात आपले स्थान एकने वाढवत देशातील पहिला शंभर स्वच्छ शहरांमध्ये राखत ८६ वा क्रमांक पटकावला आहे. पुढील वर्षी यात चांगली प्रगती होईल अशी आशा पालिका प्रशासनाने व्यक्त केली आहे.

देशात नुकतेच ‘स्वच्छ सर्वेक्षण २०१९’ ही स्पर्धा झाली. याचे पारितोषिक वितरण दिल्लीत बुधवारी झाले. पनवेल पालिका देशात ८६ वा तर राज्यात २५ व्या क्रमांकाचे स्वच्छ शहर जाहीर झाले आहे. गेल्या वर्षी ८७ वा क्रमांक होता.

दोन वर्षांपूर्वी पनवेल पालिकेची निर्मिती झाली. मात्र सिडको वसाहतीतील कचरा व्यवस्थापनाची जबाबदारी सिडकोवरच होती. सिडकोने या वर्षी ही जबाबदारी पालिकेवर टाकत काम बंद केले. त्यामुळे पनवेल पालिकेला ही जबाबदारी स्वीकारावी लागली. त्यामुळे गेल्या वर्षी स्वच्छ अभियान स्पर्धेवेळी अवघे ३० हेक्टर चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचे कचरा व्यवस्थापन या वर्षी ११० हेक्टर चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर गेले. त्यामुळे स्वच्छ अभियानात टिकून राहणे मुश्कील होते.  मोठे आव्हान होते, ते खारघर, कळंबोली, कामोठे आणि नवीन पनवेल या शहरी भागांतील साफसफाईचे. असे असताना कचरामुक्त पनवेल शहराचा पालिका आयुक्तांनी नारा देत काम सुरू केले. कचरा उचलण्यासाठी गाडय़ांची खरेदी करीत स्वच्छता मोहीम हाती घेतली. आराखडा बनवीत व्हिडीओ-ऑडीओ क्लिप, घोषणा, भित्तिचित्र यासह नागरिकांचा सहभाग घेत कचरा व्यवस्थापन केले. त्यामुळे पनवेल पहिले शंभर स्वच्छ शहरांमध्ये कायम राहिले.

खरे तर घनकचरा व्यवस्थापन हे आम्ही आव्हान म्हणूनच स्वीकारले होते. त्या दृष्टीने पनवेल कचरामुक्त करण्याचे काम सुरू आहे. या अभियानात गेल्या वर्षी पेक्षा एकने पुढे सरकलो आहोत. या वर्षीचे अनुभव पाहतो, पुढील वर्षी चांगली प्रगती होईल.   गणेश देशमुख, आयुक्त पनवेल महानगरपालिका