नेरुळ येथील डी. वाय. पाटील स्टेडियमवरील सुविधांची पाहणी

जगातील फुटबॉलप्रेमीसांठी पर्वणी असणाऱ्या फिफाच्या (फेडरेशन इंटरनॅशनल ऑफ फुटबॉल असोशिएशन) पुढील वर्षी होणाऱ्या वर्ल्डकपच्या तयारीसाठी नवी मुंबई पालिकेने दीड वर्षे अगोदर कंबर कसली असून या स्पर्धेतील काही सामने नेरुळ येथील डी. वाय. पाटील स्टेडियमवर खेळविले जाणार आहेत. या स्पर्धेत खेळणाऱ्या खेळाडूंच्या सरावासाठी नवी मुंबई पालिकेच्या वतीने नेरुळ सेक्टर १९ येथे एक मैदान तयार केले जाणार असून सुरक्षा आणि सुविधांची पाहणी केल्यानंतर फिफाच्या एका पथकाने नुकताच या मैदानाला हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे पालिका सुमारे दोन कोटी रुपये खर्चून या ठिकाणी मैदान विकसित करणार आहे.

फुटबॉल हा खेळ जगातील सर्वाधिक लोकप्रिय खेळ मानला जात असून दर चार वर्षांनी १७ वर्षांखालील खेळाडूंसाठी होणारी विश्वचषक स्पर्धा भरवण्याचा मान यंदा भारताला मिळाला आहे. अखिल भारतीय फुटबॉल असोशिएशनचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या प्रयत्नाने हा खेळ महाराष्ट्रात होणार आहे. यासाठी नवी मुंबईची निवड करण्यात आली आहे.

स्मार्ट सिटी उपक्रमाअंर्तगत अनेक प्रकल्प हाती घेणाऱ्या नवी मुंबईने या खेळाच्या आयोजनाला मान्यता दिली असून सरावासाठी दोन मैदाने तयार केली जाणार आहेत.

या स्पर्धेतील प्रमुख सामने नेरुळ येथील डी. वाय. पाटील स्टेडियमवर खेळले जाणार आहेत. या स्टेडियमची ६५ हजार प्रेक्षक सामावून घेण्याची क्षमता आहे. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दूरचित्रवाहिन्या या खेळांचे थेट प्रक्षेपण करणार आहेत.

या स्पर्धेसाठी नवी मुंबई पालिका व पोलीस यांनी सवरेतपरी सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे. पटेल यांच्या अध्यक्षतेखाली काही दिवसांपूर्वी या संदर्भात एक बैठक झाली. त्याला महापौर सुधाकर सोनावणे, पालिकेतील सत्ताधारी पक्षाचे सल्लागार माजी मंत्री गणेश नाईक, डी. वाय. पाटील अ‍ॅकॅडमीचे अध्यक्ष विजय पाटील आणि अनेक अधिकारी उपस्थित होते. स्वित्र्झलडवरून (झुरीच) आलेल्या फिफाच्या एका पथकाने स्पर्धेच्या आयोजनाची रूपरेषा स्पष्ट केली.