कंत्राटी सफाई कामगारांच्या संपामुळे नवी मुंबईत अस्वच्छता; डासांची उत्पत्ती वाढण्याची भीती

नवी मुंबई महानगरपालिकेत साफसफाई विभागासह कचरा वाहतूक व अन्य विभागांतील कंत्राटी कामगारांनी सोमवारपासून काम बंद आंदोलन सुरू केल्यामुळे शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. त्यामुळे डासांची उत्पत्ती आणि माशांचे प्रमाण वाढून रोगराई पसरण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. पालिकेकडे वारंवार मागणी करूनही किमान वेतन दिले जात नसल्याने या कामगारांनी बेमुदत आंदोलनाचे शस्त्र उगारले आहे. आंदोलन सोमवारपासून सुरू झाले असले, तरीही सफाई कामगारांनी शनिवारपासूनच कचरा उचलणे बंद केले आहे.

सफाई कर्मचारी मंगळवारी गणवेश घालून कामावर हजर झाले, मात्र रुग्णालय, तसेच कचरा वाहून नेणाऱ्या वाहनांच्या पार्किंगच्या जागेत त्यांनी ठिय्या दिला. मागण्या पूर्ण होणार नाहीत, तोपर्यंत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा कामगार संघटनेने दिला आहे. शहरात ठिकठिकाणी कचराकुंडय़ा भरून वाहत होत्या. कंत्राटदारांनी नाका कामगारांकडून जेसीबीच्या साहय्याने कचरा उचलण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, मात्र तरीही पालिका मुख्यालय, आठ विभाग कार्यालयांतील परिसर, रुग्णालये, नागरी आरोग्य केंद्रे, रस्ते, डेपोमध्ये कचरा आणि धूळ साचली आहे. या आंदोलनामुळे पालिकेने सुरू केलेल्या ओला व सुका कचरा वर्गीकरणास हरताळ फासला जात आहे. सर्व प्रकारचा कचरा एकत्र उचलण्यात येत आहे. ओल्या कचऱ्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली असून कचराकुंडीजवळून ये-जा करणाऱ्यांना नाक मुठीत धरून जावे लागत आहे. सफाई कमगार, उद्यान, मलनिस्सारण, पाणीपुरवठा, शिक्षण, मोरबे प्रकल्प, पालिका रुग्णालयांतील सहा हजार ५०० कामगार सहभागी झाले आहेत. हे काम बंद आंदोलन शांततेत सुरू असून कोणत्याही प्रकारची घोषणाबजी न करता, ऐरोली, कोपरखरणे, बेलापूर स्थानकाबाहेरील पार्किंगमध्ये, रुग्णालय बाहेर कामगार बसून आहेत. मागण्या मान्य होणार नाहीत. तोपर्यंत संप मागे घेणार नसल्याचे कामगार संघटनेने स्पष्ट केले आहे.

कचराकुंडय़ा हटवलेल्या ठिकाणांची दुरवस्था

नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील झोपडपट्टी, गावठाण, शहरी भागांतील कचराकुंडय़ा कमी करण्यात आल्या होत्या. शहर स्वच्छ दिसावे यासाठी १०० कचराकुंडय़ा हटवण्यात आल्या होत्या. त्यामुळे आता ज्या ठिकाणी कचराकुंडया नाहीत, तिथे रस्त्यावरच कचरा टाकला जात आहे. मोकाट प्राणी कचरा सर्वत्र पसरवत आहेत. त्यामुळे नागरिकांना रस्त्याने चालणेदेखील जिकिरीचे झाले आहे.

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे कचऱ्याचे ढीग साचले आहेत. कंत्राटी कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याआधी पालिकेशी पत्रव्यवहार केला नाही. सफाई कर्मचारी संपावर गेल्यामुळे कंत्राटदार व ठेकेदारांना कचरा उचलण्याचे पत्र दिले आहे. साफसफाईचा ठेका त्यांच्याकडे असल्यामुळे कचरा उचलण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्यांच्याकडून कचरा उचलण्यात येत आहे.

-जयवंत सुतार, महापौर.

नवी मुंबई शहर खाडी किनारी वसले आहे. हिवाळयात येथे डासांचे प्रमाण वाढते. रस्त्यांवर साचलेल्या ओल्या कचऱ्यामुळे डासांची उत्पत्ती मोठय़ा प्रमाणात होत असून आरोग्य धोक्यात आले आहे. मलेरिया तसेच साथीचे आजार पसरण्याची शक्यता आहे. हिवाळ्यात पडलेल्या पावसामुळे ताप व खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.

– डॉ. वर्षां राठोड, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, नमुंमपा

बुधवापर्यंत संप मिटण्याची शक्यता असून त्यानंतर शहरातील कचरा सफाई कामगारांकडून उचलला जाईल. सध्या ठेकेदारांनी नाका कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने जेसीबीद्वारे कचरा उचलण्याचे काम सुरू केले आहे. शहरात मोठय़ा प्रमाणात कचरा साचल्यामुळे सर्व कचरा उचलणे शक्य होत नाही. तरी जेवढा जमेल तेवढा कचरा उचलण्यात येत आहे.

-राजेंद्र सोनवणे, स्वच्छता अधिकारी, नमुंमपा