२ कोटी ९ लाख रुपयांचा ऐवज घरातून लंपास

वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील (एपीएमसी) भाजीपाल्याचे व्यापारी अरुण मेनकुदळे यांच्या वाशीतील घरी शुक्रवारी भरदिवसा दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास कुरिअरच्या बहाण्याने दिवाळीचे आलेले गिफ्ट दाखवून सहा अज्ञात इसमांनी रिव्हॉल्वर व चाकूचा धाक दाखवत दरोडा टाकून सुमारे २ कोटी ९ लाख ३६ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. तर घटनेला ४८ तास उलटूनही पोलिसांला आरोपी शोधण्यात अपयश आले आहे.

एपीएमसीमधील भाजीपाल्याचे व्यापारी अरुण मेनकुदळे हे वाशी सेक्टर-१७ मधील कुसुम अपार्टमेंटमध्ये राहतात. दुपारी सव्वा बाराच्या सुमारास त्यांच्या घराची बेल वाजल्याने मेनकुदळे यांच्या पत्नीने दरवाजा उघडला असता दरवाजाबाहेर एक महिला उभी असल्याचे दिसले. त्यांनी त्या महिलेकडे विचारणा केली असता कुरिअरद्वारे गिफ्ट आले असल्याचे त्या महिलेने सांगितल्यावर त्यांनी दरवाजा उघडला असता, त्या महिलेच्या पाठोपाठ आणखी पाच इसम त्यांच्या घरात घुसले. त्यांनी रिव्हॉल्वर व चाकूचा धाक दाखवत अरुण मेनकुदळे यांची पत्नी व मुलीला गप्प राहण्यास सांगितले. त्यानंतर या चोरटयांनी घरात सगळीकडे शोधाशोध करून सुमारे १ कोटी ८० लाख रुपयांची रोकड तसेच सुमारे २५ लाखाचे सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण २ कोटी ९ लाख ३६ हजारांचा ऐवज लुटून पोबारा केला.

सदर घटनेनंतर घरात डांबून ठेवलेल्या मेनकुदळे यांच्या पत्नी व मुलीने आरडाओरड केल्यानंतर त्यांचे शेजारी धावून आले व त्यांनी त्यांची सुटका केली. या घटनेची माहिती मिळताच वाशी पोलिसांसह नवी मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. याप्रकरणी वाशी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

वाशी पोलिसांच्या हाती सदर घटनेची सीसीटीव्हीमध्ये असणारी चित्रिफित मिळाली असून त्याआधारे आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. वाशी पोलिसांसह गुन्हे शाखेची विशेष पथके एकत्रितरित्या लुटारूंचा शोध घेण्यात येत आहे.

-अजयकुमार लांडगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाशी.