दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोपाची ‘भेट’; पालिकेचा अजब कारभार

गेल्या वर्षी शासनाच्या थेट लाभार्थी योजनेमुळे अनेक विद्यार्थ्यांना गणवेश मिळालाच नाही तर या वर्षी पालिका प्रशासनाने केलेल्या दप्तरदिरंगाईमुळे वर्षभर पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना नवीन गणवेश मिळालाच नाही. शैक्षिणक वर्षांच्या निकालाच्या म्हणजे शेवटच्या दिवशी विद्यार्थ्यांना घणवेशवाटप करण्यात आले. दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना तर संपर्क साधून शाळेत बोलवून गणवेश देण्यात आले. आता या गणवेशाचे करायचे काय? असा प्रश्न त्यांना पडला आहे.

नवी मुंबई महापालिकेने या शैक्षणिक वर्षांच्या शाळेच्या पहिल्याच दिवशी शालेय गणवेश वाटप करण्याची तयारी आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली होती. परंतु नवे स्वरूप निश्चित करण्यात दिरंगाई झाली आणि पालिकेचे मनसुबे फसले. त्यानंतर शासनाने आपली थेट लाभार्थी योजना मागे घेततली. त्यामुळे पुन्हा निविदा प्रक्रिया राबवून प्रस्तावाला समित्यांची मंजुरी करीत करीत शैक्षणिक वर्षे संपताना ८ कोटी १२ लाखांच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली. तो पर्यंत हे शैक्षणिक वर्षे संपत आले. त्यातच गेली महिनाभर लोकसभा निवडाणुकीची आचारसंहिता लागली, त्यामुळे १ मे महाराष्ट्रदिनी दहावीच्या विद्यार्थ्यांना व निकालाच्या दिवशी उर्वरित आठवीच्या विद्यर्थ्यांना गणवेशाचे वाटप केले आहे.

दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा मार्चअखेर संपली. पुढील वर्षी ही मुले महाविद्यालयात जाणार आहेत. त्यामुळे त्यांनी हा गणवेश महाविद्यालयात घालायचा का? असा प्रश्न विचारला जाऊ  लागला आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना शिक्षकांनी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून गणवेश घेऊ न जाण्यास सांगितले आहे. तर आठवीचे विद्यार्थी माध्यमिक विभागात गेल्यावर त्यांचा गणवेश वेगळा असणार आहे.

गणवेश कॉलेजला घालायचा का?

आमची दहावीची परीक्षा महिन्यापूर्वी संपली असून आता आमच्याशी संपर्क साधून गणवेश घेण्यासाठी आम्हाला बोलवण्यात आले आहे. आता हा शाळेचा गणवेश आम्ही कॉलेजमध्ये घालवून मिरवायचे का? असा सवाल दहावीचे विद्यार्थी करीत आहेत.

शासनाने बदलले निर्णय तसेच निविदा प्रक्रिया या सगळ्यात शालेय गणवेशवाटपाला उशीर झाला; परंतु दहावी व आठवीच्या विद्यार्थ्यांना वाटप केलेल्या गणवेशाव्यतिरिक्त इतर विद्यार्थ्यांना गणवेश पुढील शैक्षणिक वर्षांत देण्यात येतील.    – डॉ.रामास्वामी एन. आयुक्त, नवी मुंबई महापालिका