गेली ६० वर्षे दहा हजार फुटांच्या लाकडी पट्टय़ांचा सांगाडा तयार करून त्यावर जिलेटीन आणि रंगीत कागदावर कोरीव काम करून त्याचा २७ बाय १३ फूट लांबी-रुंदीचे भव्य मखर तयार केले जात आहे. यासाठी आषाढी एकादशीपासून मखराच्या कामाला सुरुवात केली जाते. त्यानंतर पुन्हा पुढील वर्षी नव्या कागदावर कोरीव काम करून नवे मखर तयार केले जाते. त्यामुळे तालुक्यातील घरगुती मखरात सर्वात मोठे मखर असलेले निसर्गस्नेही मखर पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे.

सोनारी गावातील कृष्णा गोविंद कडू यांच्या वडिलांनी घरातील एक खोली खास गणपतीसाठी राखून ठेवली आहे. या घरात परंपरेने पूर्वी बांबूच्या चिपांचा वापर करून मखराचा सांगाडा तयार केला जातो. कागदावर धारदार हत्याराने कोरीव काम करून नक्षीकाम केलेले कागद चिकटवून त्याचे मोठे मखर तयार केले जाते. यासाठी घरातील तरुण महिना-दीड महिना नोकरी-व्यवसाय सांभाळून हे काम करीत आहेत.  पूर्वी हा गणपती पाहण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमातील शाळांच्या सहलीही येत होत्या,

त्या सध्या बंद झाल्या आहेत. तर कागदावर कोरीव काम करणाऱ्या कारगिरांची संख्या रोडावली आहे. तसेच कागदाची उपलब्धता होत नसल्याने दोन वर्षे पुरतील एवढय़ा कोरीव कागदांची तयारी करून ठेवल्याचीही माहिती त्यांनी या वेळी दिली.

सध्या छोटय़ा कुटुंबाची संकल्पना रूढ होऊ लागली आहे. मुलाच्या लग्नाआधीच त्याची स्वतंत्र व्यवस्था केली जाते. तर अनेक घरांमध्ये वाद निर्माण झाल्याने परंपरागत कुटुंबाच्या एका गणपतीचे दोन ते चार गणपती झाले आहेत. असे असताना व वाढत्या शहरीकरणामुळे जागेचा अभाव असताना कडू कुटुंबाने मात्र मागील सहा दशकांपासून आपल्या पूर्वजांनी सुरू केलेली भव्य इकोफ्रेंडली गणपीतीची प्रथा कामय ठेवली आहे.

– संजय कडू