अवकाळीचा फटका; मोहोर गळाला, तुडतुडय़ा रोगाचा प्रादुर्भाव

पूनम सकपाळ, लोकसत्ता

नवी मुंबई फेब्रुवारी महिन्यापासून हापूसच्या अवीट गोडीची प्रतीक्षा असलेल्या आंबा शौकिनांना या वर्षी हापूसची वाट पाहावी लागणार आहे. गेल्या काही दिवसांपासून असलेले ढगाळ वातावरण व काही ठिकाणी झालेली अवकाळी कृपा यामुळे हापूसच्या उत्पादनावर परिणाम होत आहे. पावसाने मोहोर गळून पडत आहे, तर तुडतुडा रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने या वर्षी उत्पादनावर परिणाम होणार आहेच, शिवाय बाजारातही हापूस उशिरा दाखल होणार आहे.

कोकणातील हापूस आंब्याला नोव्हेंबर महिन्यात मोहोर फुटण्याची प्रक्रिया अंशत: सुरू होते. डिसेंबर महिन्यापासून रायगड जिल्ह्य़ातील अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन, म्हसळे तालुक्यांतील आंब्यांच्या बागांना मोहोर फुटणे सुरू होते. मात्र या वर्षी डिसेंबर महिना अर्धा संपूनही म्हणावी तशी थंडी पडत नसल्यामुळे अपेक्षेप्रमाणे आंब्याच्या झाडांना मोहोर दिसत नाही. सद्य:स्थितीला हवामान हापूसला पोषक नसून आलेला मोहोर काळवंडत असून तो गळूनही पडत आहे. त्यामुळे आंबा बागयतदार चिंतेत आहेत. हवामान बदलाची त्यांना प्रतीक्षा आहे. पुढील काही दिवसांत पोषक वातावरण निर्माण न झाल्यास त्याचा उत्पादनावरही मोठा परिणाम होणार असल्याचे आंबा बागायतदार सांगत आहेत. सध्याच्या या परिस्थितीमुळे फेब्रुवारीऐवजी मार्चअखेरीस हापूस बाजारात दाखल होईल असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

तीन-चार वर्षांपासून फटका

तीन ते चार वर्षांपासून अवकाळी पाऊस, थ्रीप्स रोगाचा प्रादुर्भाव आणि या वर्षी करोना आपत्तीमुळे आंबा उत्पादकांसाठी खडतर गेली आहेत. या वर्षी तरी चांगले उत्पादन येईल अशी आशा होती. मात्र पडत असलेला अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरण पाहता मोहोर संवर्धन करून सुपारीएवढा आंबा मोठा करणे हे उत्पादकांसमोर आवाहन आहे. या वर्षी ३० ते ३५ टक्के उत्पादन राहण्याचा अंदाज आहे.

धुक्याने तुडतुडा

हवामान बदल, ढगाळ वातावरण, धुके, अवकाळी पाऊस यामुळे आंब्याच्या पिकाला तुडतुडा रोगाचा प्रादुर्भाव झाला असून काळे डाग पडत आहेत. देठात पाण्याचा शिरकाव झाल्याने फळधारणेसाठी अडचणी येत आहेत.

सध्याचे वातावरण हापूससाठी मारक आहे. पुढील वातावरण कसे असेल यावर गणित अवलंबून आहे. उत्पादन, रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कराव्या लागणाऱ्या फवारणी हे सर्व पुढील वातावरणावर ठरले जाईल. त्यामुळे मार्च अखेर हंगाम सुरू होईल.

-महादेव मराठे, हापूस बागायतदार, देवगड

मागील आठवडय़ात पडलेल्या अवकाळी पावसाने मोहोर गळत आहे. बदलते वातावरण, धुके यामुळे हापूस उत्पादन घेणे आव्हानात्मक आहे.

-चंद्रकांत मोकाल, अध्यक्ष,महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघ