अतिक्रमणविरोधी कारवाईचा नगरपालिकेकडून बोऱ्या

राजकीय नेत्यांच्या जाहिरातबाजीला बेकायदा फलकांच्या माध्यमांतून नेहमीच ऊत येत असतो. उरण शहरही याला अपवाद ठरलेले नाही. शहरातील नाका, चौक आणि रस्त्यावर मिळेल तिथे बेकायदा फलक लागलेले आहेत. त्यामुळे शहर विद्रूपीकरणाच्या वाटेवर असल्याचे भासत आहे. यात राजकीय नेते आघाडीवर आहेत. याविरोधात नगरपालिकेने कारवाई करावी तर राजकीय दबाव असल्याचे अधिकारी सांगत आहेत. विशेष म्हणजे उच्च न्यायालयाचे आदेश पायदळी तुडविण्याची हिंमत राजकीय नेते करू लागले आहेत.

यंदा प्रजासत्ताक दिनी प्रत्येक शहर आणि गाव बेकायदा फलकमुक्त असावे, असे उच्च न्यायालयाने आदेशात म्हटले होते. पण न्यायालयाचा हा आदेश धाब्यावर बसविण्यात आला आहे. राजकीय नेत्यांनी जाहिरात होत असेल होऊ द्यात अशी आणि पालिका प्रशासनानेही तीच भूमिका घेतल्याने शहराच्या विद्रूपीकरणाचा रोग जास्त बळावत आहे.

वाहनातून ये-जा करीत असताना कोणत्या दिशेला कोणते शहर आहे, याची माहिती देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खाते तसेच सिडकोने दिशादर्शक फलक लावलेले आहेत. मात्र या फलकांवर विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या स्वागताचे व अभिनंदनाचे वा वाढदिवसांचे फलक लावल्याने दिशादर्शक फलक कायमच या बॅनरच्या मागे झाकलेले असल्याने नवीन वाहनचालकांना रस्ता विचारीत मार्गक्रमण करावे लागत आहे. आग, आपत्कालीन संपर्क आणि माहिती देण्यासाठी बोकडविरा चार फाटा येथे सिडकोच्या अग्निशमन दलाच्या वतीने दूरध्वनी क्रमांक असलेला फलकही या फलकाच्या मागे झाकला जात आहे.

या संदर्भात सार्वजनिक बांधकाम खात्याचे उरण विभागाचे उपअभियंता ए. आर. राजन यांनी न्यायालयाच्या सूचनेनंतर वाहतूक विभागाला रस्त्याच्या नाक्यांवर लावण्यात आलेल्या बेकायदा फलकांवर कारवाई करण्यासाठी पत्र दिल्याची माहिती दिली. बेकायदा फलक हटविल्याची माहिती उरण नगरपालिकेचे मुख्याधिकारी विनोद डवले यांनी दिली.