News Flash

पक्षीस्थळाची ‘माती’

खाडीकिनाऱ्यावर असलेले मासे हे अनेक पक्ष्यांचे, मुख्यत: फ्लेमिंगोचे मुख्य खाद्य आहे.

भूखंडांसाठी एकमेव पाणथळीवर जेएनपीटीकडून भराव

उरणच्या खाडी तसेच समुद्रकिनाऱ्यावर दरवर्षी विविध प्रजातींचे हजारो देशी-विदेशी पक्षी येत असून त्यांना येथील खाडीकिनाऱ्यावर त्यांचे खाद्य मिळत असल्याने अशा पक्ष्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात परदेशी पक्ष्यांचे आगमन होते, त्याची सुरुवात झाली आहे. मात्र चौथ्या बंदरामुळे पाणजे खाडीकिनाऱ्यावरील पानथळे नष्ट होत असताना सध्या उरण-पनवेल महामार्गालगत असलेल्या दास्तान ते रांजणपाडा खाडीतही असलेल्या पानथळ्यात जेएनपीटीकडून मातीचा भराव केला जात असल्याने उरणमधील पक्ष्यांचे आश्रयस्थान असलेल्या आणखी एक पानथळा नष्ट होऊ लागला आहे. त्यामुळे भविष्यात उरणमध्ये येणाऱ्या पक्ष्यांची संख्या रोडवण्याची शक्यता पक्षीप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे.

खाडीकिनाऱ्यावर असलेले मासे हे अनेक पक्ष्यांचे, मुख्यत: फ्लेमिंगोचे मुख्य खाद्य आहे. याचे सर्वाधिक प्रमाण उरणच्या खाडीकिनारी आहे. त्यामुळे मुंबईतील शिवडी तसेच नवी मुंबईतील खाडीकिनाऱ्यानंतर उरणमध्ये हजारो पक्षी दरवर्षी मुक्कामी येतात. वातावरणातील बदलामुळे तर अनेक पक्षी सध्या वर्षभर राहू लागले आहेत. फ्लेमिंगोसारखे पक्षी पाहण्यासाठी, न्याहाळण्यासाठी तसेच त्यांचा अभ्यास करण्याच्या हेतूने अनेक पक्षीप्रेमी या परिसरात येत आहेत. या पक्ष्यांच्या हजारोंच्या संख्येमुळे परिसराच्या सौंदर्यातही भर पडू लागली आहे. असे असताना जेएनपीटी व पाणजे या समुद्रकिनाऱ्यावर अडीच हेक्टरवर चौथ्या बंदराच्या उभारणीसाठी मातीचा भराव केला जात आहे. त्यामुळे या किनाऱ्यावरील पक्ष्यांचे स्थान नष्ट झाले आहे. त्यामुळे अनेक पक्ष्यांनी दास्तान विभागातील खाडीचा आसरा घेतला होता. मात्र या पानथळ्याच्या ठिकाणावर जेएनपीटी बंदराकडून मातीच्या भरावाला सुरुवात झाली आहे.

पक्ष्यांची गणना सुरू..

या संदर्भात उरणच्या वन विभागाचे वनसंरक्षक बी. डी. गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता या खासगी जागा असल्याने त्या संदर्भात वन विभाग काहीच करू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले. तर मुंबईतील पक्षीसंरक्षक संस्थेचे शौनक पाल यांच्याकडून या परिसरात येणाऱ्या पक्ष्यांची गणना केली जात आहे. त्यानंतर किती पक्ष्यांचे नुकसान होणार आहे, या संदर्भात अभ्यास करून वने व पर्यावरण विभागाकडे पक्ष्यांच्या पर्यायी पानथळ्याची मागणी केली जाणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 21, 2016 1:20 am

Web Title: uran creek bird
Next Stories
1 भाज्या पुन्हा महागल्या
2 पाऊले चालती.. : एकाग्रता, आल्हाद आणि आरोग्य..
3 आयुक्तांविरोधात अविश्वास ठराव
Just Now!
X