उरणमध्ये मासळी टंचाईचा फटका

उरण : मागील तीन महिन्यांपासून वातावरणात गारवा निर्माण झाल्याने मासळीची टंचाई निर्माण झाली आहे. कष्ट करूनही मच्छीमारांना हवा तसा फायदा होताना दिसत नाही. त्यामुळे करंजा व रेवस येथील मच्छीमारांनी सध्या नगदी फायदा देणाऱ्या शेवंडय़ा व खेकडे(चिंबोऱ्या)कडे आपला मोर्चा वळविला आहे.

कोळंबीसारखाच प्रकार असलेल्या शेवंडीला देश-विदेशातील पंचतारांकित हॉटेल्समध्ये मागणी आहे. या शेवंडीला बाजारात १२०० रुपये किलोचा दर आहे. तर समुद्रातील मोठे खेकडेही निर्यात होत असून दीड ते दोन किलो वजनाच्या खेकडय़ांचीही निर्यात परदेशात केली जाते. ही मासळी खरेदी करून ती मुंबईत निर्यातदारांकडे दिली जाते. त्यानंतर ही मासळी सिंगापूर तसेच इतर देशांतील पंचतारांकित हॉटेलांसाठी पुरविण्यात येत असल्याची माहिती खरेदीदारांनी दिली.

मासळीचे अनेक प्रकार असून त्यांचे दरही वेगवेगळे आहेत. यातील कमी प्रमाणात मिळणारी मात्र परदेशात मागणी असलेल्या मासळीला जास्त दर मिळतो. त्यामुळे सध्या मासेमारांनी जास्तीत जास्त पैसे कमाविण्यासाठी शेवंडी पकडण्यास प्राधान्य दिले आहे.

नवी मुंबईतून अनेक गावांतून खेकडय़ांची निर्यात केली जात आहे.

याकरिता खास निवडक खेकडयांची खरेदी केली जाते. या खेकडय़ांची मागणी स्थानिक ग्राहकांनी केल्यास त्याची विक्री करण्यास नकार दिला जात आहे.

उरणमधील करंजा, मोरा तसेच अलिबागमधील रेवस बंदरावर या माशांची खरेदी केली जाते. त्यानंतर या शेवंडय़ांची परदेशात निर्यात केली जात असल्याची माहिती या व्यवसाय करणारे देविदास कोळी यांनी दिली. हा व्यवसाय आपण मागील दहा ते बारा वर्षे करीत असल्याचीही माहिती त्यांनी या वेळी दिली.

या मासळीचा व्यवहार बंदरावरच होत असून त्याचे पैसेही ताबडतोब मिळतात. आम्ही हीच मासळी पकडण्याचे काम करतो. सध्या मासळीची टंचाई जाणवत असल्याने मच्छीमार सध्या खेकडी व शेवंडय़ांची मासेमारी करीत असल्याची माहिती मच्छीमार विनायक पाटील व सुयश कोळी यांनी दिली.

रुचकर आणि चविष्ट

शेवंडी पाहिल्यास भल्याभल्यांना हा मासा कसा शिजवायचा असा प्रश्न पडतो. मात्र शेवंडी हा चविष्ट व रुचकर मासा असून मटणाच्या पद्धतीने रस्सा तयार करून शिजवावे लागते. या मासळीचे पंचतारांकित हॉटेलात पदार्थ बनवून दिले जातात.