दोन वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आराखडाचा उपलब्ध नाही

उरण तालुक्यात अनेक वर्षांपासून शासनाचे तीस खाटाचे एकमेव रुग्णालय असून शासनाच्या दुर्लक्षामुळे ते अनेक समस्यांनी ग्रासलेले आहे. त्यामुळे या रुग्णालयातून उपचार घेण्यावर मर्यादा येत असल्याने उरणसाठी शंभर खाटांचे अत्याधुनिक रुग्णालय उभारावे, अशी मागणी होत होती. या रुग्णालयाला शासनाकडून दोन वर्षांपूर्वीच मान्यताही मिळाली असून द्रोणागिरी नोडमध्ये सिडकोकडून भूखंडही देण्यात आला आहे. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने या रुग्णालयाचा आराखडा तयार न केल्याने  रखडपट्टी सुरू आहे.

उरण मधील अत्याधुनिक सुविधांनी युक्त रुग्णालयाची संख्या कमी असल्याने उरणमधील रुग्णांना मुंबई, नवी मुंबई किंवा पनवेल गाठावे लागते. या प्रवासादरम्यान अनेक रुग्णांना आपला जीवही गमवावा लागला आहे. याच पाश्र्वभूमीवर सिडकोने शासनाला ५९०० स्क्वेअर मीटरचा भूखंडही दिला असून या भूखंडावर अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज, असे रुग्णालय उभारण्यात येणार आहे.

शासकीय रुग्णालयावरच सर्वसामान्यांची भिस्त

डॉक्टर्स, कर्मचारी, वैद्यकीय उपकरणे, रुग्णांना राहण्याची व्यवस्था आदी समस्यांनी उरणमधील एकमेव इंदिरा गांधी रुग्णालय विविध समस्यांनी ग्रासलेले आहे. या रुग्णालयामध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांचीही संख्या वाढली आहे. शिवाय वाढत्या महागाईमुळे वैद्यकीय उपचारांसाठी सर्वसामान्यांचा ओढा हा शासकीय रुग्णालयांकडे अधिक आहे. तर उरण परिसरातील जड वाहनांमुळे दररोज होणाऱ्या अपघातांची संख्या अधिक असल्याने अपघातात गंभीर जखमींवर उपचारांसाठी अर्धा ते पाऊण तासाचा कालावधी लागत असल्याने अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत.

रुग्णालयासाठी जेएनपीटी तसेच ओएनजीसीकडून एकूण २० कोटींचा निधी मिळणार आहे. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आराखडा तयार होणे गरजेचे असून त्यानंतर निविदा काढणे शक्य होणार आहे. यासाठी पाठपुरावा सुरू आहे.

मनोहर भोईर, आमदार, उरण.