वनविभागाची बघ्याची भूमिका
उरण तसेच जेएनपीटी परिसरात विकासकामांच्या आड येणाऱ्या खारफुटीवर मातीचा भराव टाकून खारफुटी नष्ट केली जात आहे. सिडकोच्या द्रोणागिरी नोड परिसर तसेच इतर ठिकाणी खारफुटीच्या झाडांखाली पाणी असताना ती झाडे जळू लागली आहेत. त्यामुळे खारफुटी नष्ट करण्यासाठी रसायनांचा वापर केला गेला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे. उरण परिसरात खारफुटीवर होणाऱ्या अतिक्रमणाविरोधात कारवाई केली जात असल्याचा दावा उरणच्या वन विभागाने केला असला तरी वन विभागाच्या दुर्लक्षामुळेच या खारफुटीला धोका निर्माण झाला आहे.
उरणमधील द्रोणागिरी नोड परिसरातील सिडकोच्या साडेबारा टक्के भूखंडावर इमारती उभारण्याची जोमाने कामे सुरू आहेत. अशा अनेक ठिकाणी खारफुटी असून या खारफुटीवर मातीचा भराव करून ती नष्ट केली जात आहे. तर बोकडवीरा परिसरातील उरण-पनवेल रस्त्यालगतच्या खारफुटीचा अडथळा असल्याने मे महिन्यात येथील खारफुटी जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. सध्या याच ठिकाणच्या खारफुटीची झाडे पिवळी पडून करपू लागली आहेत. त्यामुळे खारफुटी नष्ट करण्यासाठी रसायनांचा वापर केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सिडकोच्या साडेबारा टक्के भूखंडाच्या परिसरात मोठय़ा प्रमाणात खारफुटी आहे. या खारफुटीमुळेच समुद्राच्या भरतीत येथील शेती तसेच गावांचे संरक्षण होते. तसेच जीव, जंतू, मासळीच्या प्रजननाची प्रक्रियाही खारफुटीमध्ये होते. त्यामुळे नैसर्गिकदृष्टय़ा महत्त्वाच्या असलेल्या या खारफुटीचे संरक्षण करण्याची जबाबदारी नागरिकांचीही असल्याने अशा प्रकारच्या घटना घडत असल्यास तातडीने वन विभाग तसेच संबंधित अधिकाऱ्यांना कळविण्याचे आवाहन फ्रेण्डस ऑफ नेचर या संस्थेचे उपाध्यक्ष विलास गावंड यांनी केले आहे.
या संदर्भात उरण विभागाचे वनसंरक्षक चंद्रकांत मराठे यांच्याशी संपर्क साधला असता मागील वर्षभरात आवरे कडापे व जेएनपीटी परिसरातील जागेवर झालेल्या अतिक्रमणाविरोधात दोन गुन्हे दाखल झाल्याचे त्यांनी सांगितले, तसेच खारफुटीवर कोणत्याही प्रकारच्या रसायनाचा वापर केला नसल्याचे सांगत या काळात खारफुटीच्या झाडांना नवीन पाने फुटतात त्यामुळे तसेच वातावरणातील बदलामुळे खारफुटी पिवळी पडली असल्याचे मत मराठे यांनी व्यक्त केले आहे. मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी घेतल्याशिवाय खारफुटी नष्ट करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातात असेही त्यांना सांगितले. तर वन विभाग वगळता ज्या सिडको, महसूल, नगरपालिका क्षेत्रातील जमिनींवर खारफुटीवर अतिक्रमणे केली जातात. त्याची माहिती संबंधित विभागांना दिली जात असल्याचेही ते म्हणाले.