16 January 2021

News Flash

प्रत्येक घरात नळ; मात्र पंधरा दिवसांनी पाणी

राज्यात पहिल्या आलेल्या उरण तालुक्यातील स्थिती

(संग्रहित छायाचित्र)

प्रत्येक घरात नळाद्वारे पाणीपुरवठा करणारा तालुका म्हणून उरणला शासनाचा पहिला क्रमांक मिळाला असला तरी तालुक्यात अनेक गावांत आजही तीव्र पाणीटंचाई आहे. काही गावांना अनियमित पाणीपुरवठा होत असून काही गावांना तर १५ दिवसांतून एकदा पाणी मिळत आहे.

केंद्र सरकारने ‘जलजीवन मिशन’ हाती घेतले असून याअंतर्गत २०२४ पर्यंत प्रत्येक घरात नळाने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले आहे. या अंतर्गत उरण तालुक्यात २०२०-२१ या आर्थिक वर्षांत नळजोडणीच्या उद्दिष्टांच्या २३८.१० टक्के काम करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात ज्या घरांमध्ये नळजोडणी आहे, त्यांची माहिती संकलित करण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ज्या घरांमध्ये वैयक्तिक नळ जोडण्या नाहीत त्यांची माहिती घेण्यात आली. आकडेवारीनुसार रायगड जिल्ह्य़ात उरणमध्ये उल्लेखनीय काम झाल्याचे दिसत आहे. उरण तालुक्यात ३६ हजार १०८  कुटुंब असून एप्रिल २०२० पूर्वी नळजोडण्या असलेली कुटुंबांची संख्या २६ हजार ९६२ आहे. तर २०२०-२१ मध्ये ९ हजार १४६  कुटुंबीयांना नळजोडणी देण्यात आली आहे.

या शासकीय आकडेवारीनुसार तालुक्यातील सर्व कुटुंबांकडे नळजोडणी करण्यात आली आहे. या आधारे उरण तालुका हा प्रत्येक घरात नळजोडणी देणारा पहिला तालुका ठरला आहे.

असे असले तरी तालुक्यात मात्र अनेक गावांत आजही तीव्र पाणीटंचाईचा सामना ग्रामस्थांना करावा लागत आहे. यातील कोंढरी-कासवले या करंजा परिसरात पंधरा ते महिनाभरानंतर पाणीपुरवठा होत आहे. तर नागाव, केगाव

परिसरातही नेहमीच अनियमित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी आहेत. अनेक आदिवासी पाडय़ांवर आजही पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. या परिसरात नळजोडण्याही झालेल्या नाहीत. असे असताना तालुक्याला प्रथम क्रमांक कसा मिळाला याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे.

आमचं गाव उरण तालुक्यातीलच आहे ना?

उरण तालुका नळपाणी पुरवठय़ात राज्यात पहिला आला आहे, मात्र मागील अनेक वर्षांपासून नळ असूनही त्यातून पाणी येत नाही. पंधरा ते वीस दिवसांतून एकदा गावात पाणी येते. आमचं गाव उरण तालुक्यातीलच आहे ना? असा सवाल करंजातील कोंढरी पाडा येथील  विनायक पाटील यांनी उपस्थित केला आहे.

उरण तालुक्यात शंभर टक्के नळपाणी पुरवठा योजना राबविली नसली तरी सर्वात अधिक नळजोडण्या देण्यात आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी जोडण्या आहेत, मात्र त्या नळांना पाणी येत नाही हा नियोजनाचा भाग आहे. स्थानिक प्रशासनाने त्याकडे लक्ष दिले पाहिजे. पाडय़ावर पाणीपुरवठा करण्याची योजना आखण्यात आली असून त्याची लवकरच अंमलबजावणी केली जाईल.

– नीलम गाडे, गट विकास अधिकारी, उरण पंचायत समिती

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 8, 2021 12:08 am

Web Title: uran plumbing in every home but water after fifteen days abn 97
Next Stories
1 मेट्रो पुढील वर्षांअखेर धावणार
2 देवगड हापूसचे ‘एपीएमसी’त आगमन
3 पोलीस दलात फक्त ९ करोनारुग्ण
Just Now!
X