उरण : उरणमध्ये मंगळवारपासूनच पाऊस सुरू असून दोन दिवसांत ११६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली  झाली आहे. त्यामुळे येथील रानसई धरणातील पाणीसाठा वाढला असल्याने पुढील काही दिवसांच्या पाण्याचा प्रश्न सुटला असल्याची माहिती एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. तर पावसामुळे काही ठिकाणी पाणी साचण्याच्या घटनाही घडल्या होत्या.

उरणमध्ये मंगळवारपासून पावसाला सुरुवात झाली आहे. मंगळवारी दिवसभरात ६७ मिलिमीटर पाऊस झाला होता, तर बुधवारी दिवसभर ७६ मिमी पाऊस झाला. यामुळे ओएनजीसी मार्गावर मातीचा चिखल झाल्याने या मार्गावरून वाहने चालविण्यास अडथळा निर्माण होत होता. उरण चारफाटा येथील खड्डय़ात पाणी साचले होते.

उरण तालुक्यातील ग्रामपंचायती तसेच येथील उद्योगाला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी)च्या रानसई धरणातून पाणीपुरवठा केला जात आहे. या धरणाच्या पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे पाणीपुरवठय़ाची समस्या निर्माण झाली होती. ही दूर करण्यासाठी हेटवणे धरणातून उसने पाणी घेतले जात आहे. मात्र दोन दिवस झालेल्या पावसाने धरणाची दहा इंचांपेक्षा अधिक पातळी वाढली आहे. हे पाणी पुढील दोन आठवडे पुरेल इतके झाले असल्याची माहिती एमआयडीसीचे उपअभियंता रणजित बिरंजे यांनी दिली आहे.

तर उरण तालुक्यात मंगळवार व बुधवारी सायंकाळी ४ वाजेपर्यंत ११६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून पावसाचा जोर कमी असल्याने कुठेही पाणी साचल्याची घटना घडली नव्हती, अशी माहिती उरणचे नायब तहसीलदार संदीप खोमणे यांनी दिली.