नवी मुंबई : उरण शहरातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून फरार झालेल्या रोहन कासारे (२१) याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याला अलिबाग जिल्हा न्यायालयात हजर केले असता जिल्हा न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. शेजारीच राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला खाऊचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता. ही घटना मुलीच्या नातेवाईकांच्या लक्षात येताच त्यांनी या तरुणाला पकडण्याचा प्रयत्न केला होता, मात्र रोहनने पळ काढला होता.

मुलगी घरात दिसत नाही म्हणून नातेवाईकांनी तिचा शोध सुरू केला. शेजारी राहणाऱ्या तरुणाकडे विचारपूस केली असता आपल्याला माहीत नसल्याचे त्याने सांगितले. मात्र मुलीच्या नातेवाईकांना त्याचाच संशय आल्याने त्यांनी मुलाच्या घरात शोध घेतला. त्याने मुलीला दिवाणात लपवून ठेवल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी ही मुलगी निपचित पडली होती. मुलीच्या नातेवाईकांनी तातडीने मुलीला उरणमधील इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले, मात्र नेहमीप्रमाणे रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ नसल्याने मुलीला मुंबईतील जे.जे. रुग्णालयात नेण्यात आले, अशी माहिती उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र आव्हाड यांनी दिली. या प्रकरणी उरण पोलीस ठाण्यात तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र तरुण फरार झाल्याने त्याचा शोध सुरू होता. त्याला कर्जत येथून अटक करण्यात आली आहे. या तरुणावर चोरीचे गुन्हे दाखल आहेत. तसेच गांजा व चरसही घेत असल्याचे बोलले जात आहे.