जगदीश तांडेल

सिडकोची डच प्रणाली निकामी; साठवण तलाव, नाले गाळाने तुंडूब

समुद्र सपाटीपासून खाली असलेल्या उरणमधील द्रोणागिरी नोड या भागातील समुद्राच्या भरतीच्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी सिडकोने ‘डच’ देशातील नाले, साठवणूक तलाव यांच्या प्रणालीचा वापर केला होता. यासाठी सिडकोकडून कोटय़वधींचा निधी खर्च केला, मात्र ही प्रणाली निकामी ठरत आहे. भरतीचे पाणी येथील गावांत शिरू लागल्याने घरांबरोबर शेतीचे नुकसान होऊ लागले आहे. संपूर्ण उरण तालुक्यालाच समुद्राच्या भरतीच्या पाण्याचा धोका निर्माण झाला आहे.

सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबईचा भाग म्हणून उरणचा विकास होत आहे. हा विकास करीत असताना सिडकोने आराखडा तयार केला. वर्षांनुवर्षे नैसर्गिकरित्या समुद्राच्या भरती ओहटीच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी असलेली प्रणाली सिडकोने बदलण्यास सुरुवात केली. त्यामुळे गावातील नैसर्गिक नाले नष्ट होऊ लागले. त्यातच पूर्वीच्या लोकसंख्येत वाढ होत असल्याने सध्या या भागातील नागरीककरण झपाटय़ाने वाढत आहे. या वाढत्या नागरीकरणाच्या तुलनेत येथील नाले व पाण्याचा निचरा करणारी यंत्रणा कमी पडत असल्यानेच तसेच समुद्रातील भरतीचे प्रमाण वाढून पाणी आता गावा गावात शिरू लागले आहे. समुद्राचे पाणी गावात शिरल्यानंतर ओहटीच्या वेळी ते परत जात नसल्याने गावांत रोगराईही पसरू लागली असल्याचे मत बोकडविरा येथील नागरिक हिरालाल पाटील यांनी  सांगितले. आमचे नैसर्गिक नाले हे सिडकोकडून बुजविण्यात आले आहेत. त्यामुळेच ही स्थिती निर्माण झाली असल्याची माहिती त्यांनी दिली. अशाच प्रकारची स्थिती ही जेएनपीटी बाधित गावांच्या परिसरातही झालेली असून या भागातील गावांना समुद्राचे पाणी शिरू लागल्याने नुकसान होत आहे. पावसाळ्यात तर अधिक बिकट परिस्थिती होत असल्याने जसखार सारख्या गावात दरवर्षी गुडघाभर पाणी साचत असते.

उरणमधील पाण्याचा निचरा करण्यासाठी सिडकोकडून डच तंत्रज्ञानावर आधारित यंत्रणा राबविण्यात आलेली होती. त्यानुसार समुद्राच्या भरतीचे या भागात येणारे पाणी पाच साठवणूक तलावात थेट जमा करून ओहटीच्या वेळी ते परत पाठविणारी या यंत्रणा साठवणूक तलावात गाळ साठल्याने निकामी ठरत आहे.

-रमेश गिरी, अधीक्षक अभियंता, द्रोणागिरी नोड.