उरण

मुंबईतील बीपीसीएलच्या तेलशुद्धीकरण केंद्रात गेल्या आठवडय़ातच आग लागल्याच्या पार्श्वभूमीवर उरणमधील तेलसाठय़ांच्या सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला आहे. येथील साठेही सुरक्षित नसल्याने अपघात झाल्यास उरणवासीयांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हे साठे सुरक्षित ठेवण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी मोर्चाही काढला असून सुरक्षेच्या उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

बीपीसीएल कंपनीचे साठवणूक तळ असलेल्या मुंबईच्या समुद्रातील बुचर बेटावर तेलाच्या टाक्यांना लागलेली भयानक आग ताजी असतानाच चेंबूर येथेही याच कंपनीत आग लागली. अशाच प्रकारची स्थिती उरण परिसरात आहे. उरण तालुक्यात विविध ठिकाणी तेलजन्य अतिज्वलनशील पदार्थाचा साठा आहे. येथील ओएनजीसी प्रकल्पात याआधीही आगीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे उरणही या ज्वालामुखीच्या मुखावर वसलेले आहे. त्यामुळे येथील ज्वलनशील पदार्थाच्या साठय़ांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष देण्याची मागणी जोर धरत आहे.

उरणमध्ये १९७५ मध्ये ओएनजीसीला सापडलेल्या तेलविहिरीतील कच्च्या तेलावर प्रक्रिया करणाऱ्या एका शुद्धीकरण प्रकल्पाची उभारणी करण्यात आली. समुद्रातून अडीचशे किलोमीटर अंतरावर टाकण्यात आलेल्या तेलवाहिन्यांतून हे खनिज तेल या प्रकल्पात आणले जाते. त्यानंतर त्याच्यावर प्रक्रिया करून त्यातून पेट्रोल, डिझेल, रॉकेल, लिक्विड पेट्रोलिया गॅसची (एलपीजी) निर्मिती आणि वितरण केले जाते. देशभरात वितरित होणाऱ्या या तेल व वायूच्या वाहिन्या उरणमधून गेल्या आहेत.

दुसरीकडे जेएनपीटी बंदरात देशातील विविध खासगी व सरकारी कंपन्यांकडून आयात करण्यात आलेल्या तेल तसेच ज्वलनशील व अतिज्वलनशील पदार्थाची हाताळणी केली जाते. हे पदार्थ जहाजातून वाहून बंदरात आणले जातात. त्यानंतर वाहिन्यांद्वारे ते जवळच असलेल्या साठवणूक टाक्यांत भरले जातात. त्यानंतर ते टँकरद्वारे देशभरात वितरित केले जातात. ओएनजीसीच्या तेल शुद्धीकरण प्रकल्पातून तयार होणाऱ्या एलपीजीवर आधारित बीपीसीएलचा प्रकल्पही उभारण्यात आलेला आहे. या प्रकल्पातून दररोज हजारो घरगुती गॅसचे सिलिंडर भरले जातात. टँकर भरूनही तेल वितरित केले जाते. या प्रकल्पातील साठवणुकीतही वाढ करण्यात आली आहे.

या प्रकल्पाला वायू कमी पडत असल्याने परदेशातून वायू आयात केला जात आहे. तो वाहिन्यांद्वारे प्रकल्पाच्या ठिकाणी आणला जातो, तर आयओटीएल कंपनीच्याही साठवणूक टाक्या बंदरापासून आठ ते दहा किलोमीटर अंतरावर आहेत. त्यासाठीही वाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण तालुक्यात तेलवाहिन्यांचे जाळे पसरलेले आहे. यातील अनेक वाहिन्यांना छिद्रे पाडून त्यातून तेलचोरी केली जाते. अशा घटना यापूर्वी घडल्या आहेत. या घटनांची माहिती वेळेत मिळाल्याने व तातडीने उपाययोजना केल्याने अनर्थ टळला होता. तर अशाच प्रकारच्या तेलगळतीच्या व अतिज्वलनशील पदार्थगळतीच्या घटना घडल्याने आगी लागल्या होत्या.

या आगीत मोठी हानी झाली नसली तरी २००७ मध्ये ओएनजीसीत लागलेल्या आगीत दोघांना आपले प्राण गमवावे लागले होते. या घटनेमुळे नागरिकांकडून वारंवार भीती व्यक्त केली जात आहे. साठवणूक टाक्यांमुळे या परिसरात भीतीचे वातावरण असते. अनेक ठिकाणी असलेल्या साठवणूक टाक्यांतून तेलगळती होण्याच्या घटनाही घडल्या आहेत. या गळतीमुळे आगीची भीती तर व्यक्त केली जात आहेच; परंतु हे तेल किंवा रसायन पाण्यात मिसळत असल्याने येथील नागरिकांचा जोडव्यवसाय असलेल्या मासेमारीवरही परिणाम होऊ लागला आहे.

एकीकडे मासळीचे प्रमाण कमी होत असतानाच, रसायने व तेलाच्या गळतीमुळे समुद्र प्रदूषित होऊन माशांचे प्रमाण अधिकच घटू लागले आहे. बाधित होणाऱ्या मच्छीमारांना भरपाईही दिली जात नाही. ती मिळावी, अशी मागणी येथील कंपन्यांकडे वारंवार केली आहे. या संदर्भात हरित न्यायालयातही मच्छीमारांनी धाव घेतलेली होती. त्याचा निकालही लागला असला तरी मच्छीमारांना अद्याप भरपाई मिळालेली नाही.

कंपन्यांकडून उपाययोजनांची अपेक्षा

येथील साठवणूक टाक्यांची सुरक्षा वाढवण्यात यावी आणि चेंबूर येथील दुर्घटनेची येथे पुनरावृत्ती होणार नाही, याची काळजी घेतली जावी, अशी मागणी उरणवासीय करत आहेत. येथील कंपन्यांनी याची दक्षता घ्यावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.