सहकारी बँकेत पैसे अडकल्याने उरणमधील तरुणीची फरफट

नाव : मनाली शिंदे. हुद्दा : पुण्यातील एका हॉटेलात व्यवस्थापक.. सोमवारी, २१ नोव्हेंबर रोजी मनालीचा विवाह होणार आहे. तयारी पूर्ण करण्याच्या प्रयत्नांना शिंदे कुटुंबीय आहेत.  ही तयारी सध्या उसनवारीवर सुरू आहे. नातेवाईक आणि मित्रमंडळींकडून आर्थिक मदत घेतली जात आहे. कारण एकच आहे.. उरणमधील ‘अलिबाग को-ऑपरेटिव्ह’ बँकेत मनालीने आईच्या नावे ठेवलेले सव्वा लाख रुपये अडकून पडले आहेत. बँक व्यवस्थापकांनी पुरेशी रोकड नसल्याचे कारण पैसे देण्यास असमर्थता दर्शविली आहे. यासाठी गेले तीन दिवस शिंदे कुटुंबीय शाखेत हेलपाटे मारत आहे; परंतु हतबलतेशिवाय त्यांच्या हाती काहीच न लागल्याने अशा मंगलक्षणी घरात संतापाचे वातावरण आहे.

‘नोटाबंदीच्या निर्णयाने आमच्या लग्नावरच संकट आले आहे; आम्ही करायचे काय’, असा आक्रोश शिंदे कुटुंबीयांनी केला आहे.

‘सहकारी बँकांमधील ठेवीवर बंधने आहेत. घरात मुलीचे लग्न आहे. अशा प्रसंगी उसनवारी करायची पाळी आली आहे. आमचेच पैसे महत्त्वाच्या सोहळ्यासाठी मिळविताना विनंत्या का कराव्या लागत आहेत, असा सवाल शिंदे कुटुंबीयांनी केला आहे.

उरण कोट नाका येथे शिंदे कुटुंबीय राहतात. मनाली ही पुण्यात एका हॉटेलमध्ये व्यवस्थापक आहे. तिचे लग्न कोलकात्यातील तरुणाशी होणार आहे; परंतु लग्नसोहळ्यासाठी लागणारे पैसेच सहकारी बँकेत अडकून पडल्याने शिंदे कुटुंबीयांसमोरील अडचणी वाढल्या आहेत.

लग्नसोहळ्याच्या खर्चासाठी पुरावे देऊन अडीच लाखांपर्यंतची रक्कम काढण्याची मुभा केंद्राने दिली आहे. यासाठी मनालीने ५० हजार रुपयांसाठी बँकेत अर्ज केला आहे. यावर बँक व्यवस्थापक नरेंद्र पाटील यांनी, शाखेत दिवसाला केवळ दोन लाखांचीच रोकड जमा होत असल्याने एकाच ग्राहकाला ५० हजारांची रक्कम द्यायची कशी, असा प्रतिसवाल केला आहे.

‘सहकारी बँकांच्या वरिष्ठ कार्यालयाने या संदर्भात पुरेशा रोख रकमेबाबत तरतूद केल्यास आम्ही तातडीने ग्राहकांना ती अदा करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

लग्न उरणमध्ये पार पडणार आहे. त्यानंतर आम्ही कोलकात्याला जाणार आहोत. त्यानंतर माझे कुटुंबीय तेथे येणार आहे. त्यासाठी त्यांना पैसे लागणार आहेत. त्यामुळे पैशांची खूपच निकड आहे, असे मनालीने स्पष्ट केले.