रायगड. उरण

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या गट व गणासाठीच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून या निवडणूकीत मतदारांनी दिलेल्या कौलानुसार २०१४ च्या विधानसभा तसेच डिसेंबर २०१६ मध्ये झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकांत क्षीण झालेल्या काँग्रेस व शेतकरी कामगार पक्षाला नवसंजीवनी मिळाली आहे, तर निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर शिवसेना व भाजप या निवडणुकीत एकत्र येऊन निवडणुका लढविणार असे चित्र असताना दोघांनीही स्वबळाची भाषा केल्याने त्यांच्यात झालेल्या दुहीचा फटका या दोन्ही पक्षांना बसला आहे. या निवडणुकीत जिल्हा परिषद गट व पंचायत गणांतील दोघांचीही बेरीज केल्यास त्यांना अभूतपूर्व असे यश मिळण्याची शक्यता होती.

उरणमध्ये २०१४च्या विधानसभा निवडणुकांपासून राजकीय वातावरण ढवळून निघाले. अनेक वर्षे मित्रपक्ष म्हणून एकत्र निवडणुका लढविणाऱ्या शिवसेना व भाजपमध्ये फूट पडली. तर काँग्रेस, राष्ट्रवादीनेही वेगळ्या चुली मांडल्या. उरण विधानसभा मतदारसंघात २००९ च्या निवडणूकीत शेकापने पहिली सलामी दिली होती. त्यावेळी शेकाप, शिवसेना आणि भाजप हे तिन्ही पक्ष एकत्र होते. यात भाजपाची ताकद ही फक्त नगरपालीका क्षेत्रापुरतीच मर्यादित होती. मात्र २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदींच्या नेतृत्वाखाली मिळविलेल्या यशानंतर या तिन्ही पक्षांत फूट पडली. लोकसभेनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत सर्वच प्रमुख पक्षांनी आपले उमेदवार उभे केले. यातून त्यांच्या ताकदीचा अंदाज आला. उरण विधानसभेत शिवसेनेने शेकापचा निसटता पराभव केला, तर काँग्रेस तिसऱ्या आणि भाजपाने चौथ्या क्रमांकाची मते मिळविली होती. मित्रपक्ष असलेल्या तिन्ही पक्षांतील फूट नगरपालिका निवडणुकीत अधिक वाढली. या निवडणुकीतही सेना भाजप एकत्र येऊ शकले नाहीत. भाजपने स्वबळावर सत्ता आणली, तर शेकापने काँग्रेस- राष्ट्रवादीसोबत ही निवडणूक लढविली होती.

याचा त्यांना काहीच फायदा झाला नाही. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपात युतीच्या फेऱ्या झाल्या, मात्र त्यात निर्णय होऊ शकला नाही. २१ फेब्रुवारीला झालेल्या निवडणुकीची या दोन्ही पक्षांची आकडेवारी पाहिल्यास हे दोन्ही पक्ष एकत्र आले असते तर निश्चित युतीची एकहाती सत्ता आली असती असे चित्र आहे. असे असले तरी निवडणुकीनंतर पंचायत समितीसाठी हे दोन्ही पक्ष एक झाल्यास सत्तेचा दावा करू शकतात.