औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक पदार्थामुळे असाध्य आजारांचा धोका
येथील वाढत्या औद्योगिक तसेच जेएनपीटी बंदर परिसरात रासायनिक पदार्थाच्या हाताळणीत वाढ झालेली असून त्याच्या उग्रवासाचा परिणाम येथील नागरिकांच्या आरोग्यावर होऊ लागला आहे. यामुळे कॅन्सरसारखे असाध्य आजार जडण्याची भीतीही व्यक्त होत आहे. तर दुसरीकडे रस्त्याला पडलेल्या खड्डय़ांतील धूलिकणांमुळे अनेकांना श्वसनाचे आजार जडत आहेत. या संदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कोणतीच कारवाई अथवा उपाययोजना होत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहर हे प्रदूषणात अग्रेसर बनले आहे. मुंबईच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या रायगड जिल्ह्य़ातही सर्वात जास्त औद्योगिकीकरणामुळे रासायनिक कारखाने व प्रकल्प उभे राहिले आहेत. त्यामुळे उरण तालुक्याची औद्योगिक परिसर म्हणून ओळख निर्माण झाली आहे. ओएनजीसीचा तेल शुद्धीकरण प्रकल्प नाफ्त्यासारख्या अतिज्वलनशील व उग्र वासाच्या पदार्थाची साठवणूक केली जाते. अनेकदा या परिसरात एलपीजी या घरगुती वापराच्या वायूचा मोठय़ा प्रमाणात दरवळ पसरण्याच्या घटनाही घडल्या आहेत.
या संदर्भात परिसरातील ग्रामपंचायतींच्या वतीने तक्रारीही करण्यात आलेल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ओएनजीसीमधून येणाऱ्या वायूच्या वासामुळे नागाव, केगाव, करंजा तसेच म्हातवलीमधील नागरिक त्रस्त झाले आहेत. वायूचा वास इतका उग्र असतो की प्रभात फेरीसाठी येणाऱ्यांना गुदमरल्यासारखे होत असल्याचे उरण पंचायत समितीच्या माजी सदस्या माया काका पाटील यांनी दिली.
माहिती देण्यास नकार
या संदर्भात नवी मुंबईच्या महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संचालक डॉ. अनंत हर्षवर्धन यांच्याशी संपर्क साधला असता या संदर्भात दूरध्वनीवरून माहिती न देता प्रत्यक्ष कार्यालयात येऊन भेटा, असे सांगून माहिती देण्यास नकार दिला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 12, 2019 12:32 am