25 September 2020

News Flash

उरण औद्योगिक वसाहतीची सुरक्षा ऐरणीवर

जेएनपीटी बंदर परिसरातही मोठय़ा प्रमाणात विविध प्रकारची रसायनांची साठवण केली जाते.

उरणमध्ये ४० वर्षांपासून ओएनजीसीच्या तेलशुद्धी प्रकल्पामुळे अतिज्वलनशील पदार्थाची साठवणूक केली जात आहे. या प्रकल्पातून नाफ्त्याची गळती झाल्याने आग लागल्याने दोघांना जीव गमवावा लागला होता, तसेच काम करीत असताना स्फोट झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. तर जेएनपीटी बंदर परिसरातही मोठय़ा प्रमाणात विविध प्रकारची रसायनांची साठवण केली जाते. इंडियन ऑइल मधून नाफ्ताची वाहिनीतून चोरी करीत असताना स्फोट होऊन एकाचा मृत्यू झाल्याची घटनाही ताजी आहे. त्याचप्रमाणे २०११ला न्यू मर्क्‍स या गोदामात रसायनांच्या स्फोटामुळे मोठी आग लागून कामगार दगावले होते. त्यामुळे गुरुवारी डोंबिवलीत झालेल्या रासायनिक कंपनीच्या स्फोटामुळे पुन्हा एकदा उरणच्याही सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.अरबी समुद्रातील तेल विहिरीतून काढण्यात येणाऱ्या कच्च्या तेलावर प्रक्रिया करणारा ओएनजीसीचा तेल शुद्धीकरण प्रकल्प उरणमध्ये उभारण्यात आला आहे.
या प्रकल्पात करोडो लिटर अतिज्वलनशील नाफ्ता, घरगुती वापराचा वायू, पेट्रोल, डिझेल, केरोसिन यांची कच्चा तेलातून वर्गवारी केली जाते. त्यानंतर त्याचा पुरवठा मुंबई तसेच इतर ठिकाणी वाहिन्यामार्फत केला जातो. याच प्रकल्पापासून काही अंतरावर जेएनपीटी आहे. या बंदरातून केंद्र सरकारच्या तसेच खासगी तेल कंपन्यांसाठी आयात करण्यात येणाऱ्या पेट्रोलजन्य पदार्थाची साठवणूक बंदराशेजारीच टँक फार्म उभारून करण्यात आलेली आहे.
या टँक फार्ममधील अनेक कंपन्यांतील साठवण टाक्यात लाखो लिटर रसायनांचा साठा आहे. त्याचप्रमाणे काही अंतरावर भारत पेट्रोलियमचा गॅस भरणा संयंत्र आहे. मागील अनेक वर्षांत ओएनजीसीमधून झालेल्या अतिज्वलनशील पदार्थाच्या गळतीमुळे आगीच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये काहींना प्राणही गमवावे लागले आहेत. तर जहाजातून पेट्रोलजन्य पदार्थाची वाहतूक करणाऱ्या तेल वाहिन्यांना छिद्र पाडून त्यातील ज्वलनशील डिझेल, नाफ्ता चोरीच्या घटना घडल्या आहेत.
त्यामुळे हा परिसर धोकादायक बनला असून इंडियन ऑइलच्या धुतूम येथील साठवणूक केंद्रातून तेल चोरी करीत असताना टँकरचा स्फोट झाल्याचीही घटना दोन वर्षांपूर्वी घडली होती.
ज्वलनशील, रासायनिक पदार्थ असतानाही या परिसरात उद्भवणाऱ्या समस्येवर उपाययोजना व नियंत्रण करण्यासाठी स्वतंत्र आपत्कालीन समिती अस्तित्वात नाही. या संदर्भात उरणचे तहसीलदार नितीन चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी औद्योगिक सुरक्षा विभागाकडून तपासणी केली जाते, असे या वेळी बोलताना स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 28, 2016 12:54 am

Web Title: urban industrial colonies security issue
Next Stories
1 पर्यावरण रक्षणासाठी रोज ४० किलोमीटरची पायपीट
2 भूखंडांसाठी पालिका सिडकोच्या दारी तिष्ठती
3 रोगाची लागण झालेल्या ७० वृक्षांची तोडणी
Just Now!
X