लोकसत्ता प्रतिनिधी

नवी मुंबई : ऐरोली सेक्टर १६ येथील एका मिठाई दुकानात पाणीपुरीसाठी पाणी कमी पडल्याने ते शौचालयातील नळाचे पाणी वापरल्याचा प्रकार एका महिला ग्राहकाने उजेडात आणला आहे. याची चित्रफीत प्रसारित झाल्यानंतर तीव्र संताप व्यक्त झाला. त्यानंतर दुकान मालकाने हात जोडून माफी मागितली असून पुन्हा असा प्रकार घडणार नसल्याचे सांगितले.

हा घटनेने ठाण्यातील पाणीपुरी विक्रेत्याने केलेल्या किळसवाण्या घटनेची आठवण झाल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.  ऐरोलीमध्ये वेलकम स्वीट मार्ट हे मिठाईचे दुकाने असून येथे पाणीपुरीही विकली जाते. या ठिकाणी एक महिला पाणीपुरी खाण्यासाठी आपल्या मुलीसह गेली असता पाणी कमी पडले म्हणून पाणीपुरी देणाऱ्याने शौचालयातून एका मगमध्ये पाणी आणले. हा सर्व प्रकार त्या महिला ग्राहकाने पाहिल्यानंतर दुकानदार व त्यांच्यात वाद झाला.

हा प्रकार या महिलेने इतरांनाही सांगितल्यानंतर गोंधळ उडाला, ही घटना समजल्यानंतर या ठिकाणी सामाजिक आणि राजकीय कार्यकर्तेही धडकले. त्यांनी दुकानदाराला धारेवर धरल्यानंतर सुरुवातीला उडावाउडवीची उत्तरे देणाऱ्या या दुकानमालकाने हात जोडून माफी मागितली. असा प्रकार पुन्हा होणार नाही असे सांगितले. या घटनेची चित्रफीत प्रसारित झाली असून नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.

या घटनेनंतर दुकानावर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करीत दुकान बंद केले. मात्र काही वेळानंतर दुकान पुन्हा उघडले गेले.